कोणत्याही दिवशी, कोणत्याही वेळी तिकीट खिडक्यांसमोर असलेली गर्दी कमी करण्यासाठी आता पश्चिम रेल्वे सज्ज होत आहे. मध्य रेल्वेने एटीव्हीएम आणि जेटीबीएसला चालना देत सीव्हीएम कूपन्सची लोकप्रियता कमी केली आहे. मात्र पश्चिम रेल्वेवर सीव्हीएम कूपन्सना अधिक सक्षम पर्याय उपलब्ध नाही. पण या समस्येवर तोडगा म्हणून येत्या दोन महिन्यांत पश्चिम रेल्वेमार्गावरील ४० स्थानकांसाठी तब्बल ५०० एटीव्हीएम मशीन्स बसवण्यात येणार आहेत. सध्या या ४० स्थानकांवर मिळून फक्त ८० एटीव्हीएम मशीन्स आहेत.
रेल्वे बोर्डाने सीव्हीएम कूपन्सना आणखी एका वर्षांची मुदतवाढ देण्यामागे पश्चिम रेल्वेमार्गावर गेल्या दोन वर्षांत सीव्हीएम कूपन्सना अधिक सक्षम पर्याय उपलब्ध झाला नाही, हे प्रमुख कारण आहे. पश्चिम रेल्वेवर सध्या ४० स्थानकांवर मिळून फक्त ८० एटीव्हीएम मशीन्स आणि सीव्हीएम कूपन्स एवढीच तजवीज आहे. यापैकी सीव्हीएम कूपन्सचा पश्चिम रेल्वेच्या तिकिटांतील वाटा १७ टक्के आहे, तर १० टक्केच विक्री एटीव्हीएम मशीन्सवरून होते. उर्वरित ७३ टक्के तिकीट विक्रीसाठी पश्चिम रेल्वे अजूनही तिकीट खिडक्यांवरच अवलंबून आहेत.
आमच्या स्थानकांवर मुबलक प्रमाणात तिकीट खिडक्या आहेत. त्यामुळे आम्हाला जेटीबीएसचा पर्याय चाचपण्याची गरज वाटत नाही. मात्र सीव्हीएम कूपन्सना सक्षम पर्याय म्हणून आम्ही येत्या दोन महिन्यांत ५०० नवीन एटीव्हीएम मशीन्स पश्चिम रेल्वेच्या ४० स्थानकांवर बसवणार आहोत, असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शरत् चंद्रायन यांनी ‘वृत्तान्त’शी बोलताना सांगितले.
प्रत्येक स्थानकावर प्रवेश करण्याच्या ठिकाणी दोन-दोन एटीव्हीएम असणे गरजेचे आहे. त्याशिवाय प्रवाशांना त्याचा फायदा होणार नाही. सध्या आमच्याकडे असलेली ८० मशीन्स त्यासाठी अपुरी आहेत. आता ५०० एटीव्हीएम मशीन्स आल्यानंतर प्रमुख स्थानकांबरोबरच इतर स्थानकांवरही प्रवेश करण्याच्या ठिकाणी ही मशीन्स बसवण्यात येतील. प्रवासी जास्तीत जास्त ज्या स्थानकांवर जाण्यासाठी तिकीट काढतात, ती स्थानके मशीनच्या स्क्रीनवर ठळकपणे दिसतील आणि एका क्लिकद्वारे प्रवाशांना त्या स्थानकांपर्यंतचे तिकीट मिळेल, अशी प्रणाली या एटीव्हीएम मशीन्सवर विकसित करण्याचा आमचा विचार आहे, असेही चंद्रायन यांनी स्पष्ट केले.