शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अस्थिकलश मालेगाव येथे गुरूवारी दर्शनासाठी आणण्यात आणल्यानंतर आ. दादा भुसे , शिवसेना तालुकाप्रमुख अ‍ॅड. संजय दुसाने यांच्यासह शहर व तालुक्यातील पाच हजाराहून अधिक शिवसैनिकांनी मुंडन केले. येथील बाजार समिती आवारात बाळासाहेबांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी सर्वपक्षीय शोकसभेचेही आयोजन करण्यात आले होते.
संगमेश्वरातील महादेव घाटावर सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत नागरिकांच्या दर्शनासाठी हा अस्थिकलश ठेवण्यात आला होता. दर्शनासाठी नागरिकांची मोठी गर्दी उडाली होती. सजवलेल्या रथातून हा अस्थिकलश मिरवणुकीने नंतर महादेव मंदीराजवळ आणण्यात आला. अर्धा तास तेथे हा अस्थिकलश ठेवल्यानंतर मोसमपुलमार्गे तो बाजार समिती आवारात आणण्यात आला. दुपारी दोन वाजेपर्यंत लोकांनी तेथे अस्थिकलशाचे दर्शन घेतले. या ठिकाणी सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. शोकसभेस सेनेचे उप जिल्हाप्रमुख कारभारी आहेर, आ.दादा भुसे, आ. मौलाना मुफ्ती इस्माईल, ज्येष्ठ नेते सुरेश निकम, हरिलाल अस्मर, प्रल्हाद शर्मा, काँग्रसचे डॉ. तुषार शेवाळे, राष्ट्रवादीचे राजेंद्र भोसले, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ओमप्रकाश गगराणी, भाजपचे दीपक पवार, सुनिल चौधरी, हरिप्रसाद गुप्ता, बंडू बच्छाव, दीपक निकम, संजय माळी, आदी मान्यवर उपस्थित होते. सभेत प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिवसेनाप्रमुखांच्या कार्याची महती सांगितली. मालेगाववर त्यांचे खास प्रेम असल्याचा उल्लेख करून त्यांच्या विविध आठवणींना यावेळी उजाळा देण्यात आला. महादेव घाटावर दर्शनासाठी अस्थिकलश ठेवल्यानंतर त्या ठिकाणी शिवसैनिकांनी मोठय़ा प्रमाणावर मुंडन केले. या शिवाय तालुक्यातील ग्रामीण भागातही ठिकठिकाणी शिवसेनाप्रमुखांच्या चाहत्यांनी मोठय़ा प्रमाणावर मुंडन केले. मुंडन करणाऱ्यांची ही संख्या पाच हजाराहून अधिक असल्याचा अंदाज आहे.