सामाजिक युवक कार्यकर्ते जयराज नागणसुरे यांनी आपले वडील धनराज नागणसुरे यांच्या एकसष्ठीनिमित्त उद्या, शुक्रवारपासून १८ डिसेंबपर्यंत पाच दिवस विविध शैक्षणिक, आध्यात्मिक व्याख्यानमाला, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, ग्रंथ वाटप, धान्य तुलाभार व हास्यधारा आदी भरगच्च कार्यक्रम आयोजिले आहेत.
सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील जयराज नागणसुरे यांनी आपल्या वडिलांची एकसष्ठी ही खासगी बाब असली, तरी त्यानिामित्ताने सामाजिक बांधिलकी म्हणून विविध उपक्रम हाती घेतले आहेत. याबाबतची माहिती त्यांनी स्वत: पत्रकार परिषदेत दिली. उद्या शुक्रवारी सायंकाळी तुळजापूर वेशीतील सिद्धेश्वर बोर्डिगमध्ये डॉ.राजलक्ष्मी गायकवाड यांचे ‘एकविसाव्या शतकातील आव्हाने’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. याशिवाय प्रा. पंडित सातपुते, प्रा. संतोष यादगिरी व अ‍ॅड. अमित आळंगे हे ‘युवकांची दिशा’ या विषयावर संवाद साधणार आहेत. शनिवारी, १५ डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता जुळे सोलापुरातील बिलाल नगरात रॉयल कोिंचंग क्लासेसमध्ये प्रा.शिवाजी व्हनकेडे यांचे ‘सुखी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर व्याख्यान होईल. तर दि. १६ रोजी सकाळी ११ वाजता विजापूर ररत्यावरील मंत्रिचंडक पार्कमध्ये आधार केअर सेंटर येथे धनराज नागणसुरे यांचा धान्य तुलाभार करून हे धान्य गोरगरिबांना वाटप केले जाईल. तसेच ६१ ज्येष्ठ नागरिकांना आध्यात्मिक ग्रंथ देऊन सन्मानित केले जाईल. या वेळी अशोक सुरतगावकर व काशीनाथ भतगुणकी यांचा ‘हास्यधारा’ हा कार्यक्रम सादर होणार आहे. दि. १७ रोजी सायंकाळी सहा वाजता दयानंद महाविद्यालय विद्यार्थी वसतिगृहात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन होणार आहे. तर दि. १८ रोजी सायंकाळी पाच वाजता भवानी पेठेतील मंत्रिचंडक नगरात धनराज नागणसुरे यांचा एकसष्ठीनिमित्त सत्कार सोहळा आयोजिल्याचे जयराज नागणसुरे यांनी सांगितले.