तालुक्यातील नांदगाव सदो प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या फांगुळगव्हाण उपकेंद्रात नेमणुकीला असणारे आरोग्य सेवक आणि सेविका महिन्यापासून गैरहजर असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामपंचायतीच्या सदस्यांकडून केली  आहे. रुग्णांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने बैठक बोलावून नवीन कर्मचारी नियुक्त करावेत, असा ठराव संमत केला. सुमारे चार हजार लोकसंख्या असलेल्या फांगुळगव्हाण गावासह परिसरातील १५ खेडय़ांतील ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी या गावात शासनाने प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू केले असून या केंद्रासाठी नियुक्त आरोग्यसेविका आणि कर्मचारी महिन्यापासून उपस्थित राहात नसल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. रुग्णांना नाइलाजाने इगतपुरी किंवा घोटी येथील ग्रामीण रुग्णालय अथवा खासगी रुग्णालयात उपचारासाठी जावे लागते. आरोग्य विभागाने नेमणुकीस असलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी तसेच नवीन कर्मचारी नियुक्त करावेत, अशी मागणी सरपंच सुमित्रा म्हसणे यांसह गोरख म्हसणे, राजू जगताप यांनी केली.