करमाळा-जेऊर रस्त्यावर स्कॉर्पिओ गाडी व मोटारसायकल यांची जोरदार धडक बसून घडलेल्या अपघातात मोटारसायकलवरील दोन महिला व एका इसमासह तिघेजण जागीच मरण पावले. शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात स्कॉर्पिओमधील दुहेरी उपमहाराष्ट्र केसरी अतुल पाटील हे गंभीर जखमी झाले.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार करमाळा-जेऊर रस्त्यावर देवळालीजवळ स्कॉर्पिओ गाडी व हिरो होंडा मोटारसायकल यांची धडक बसली. यात मोटारसायकलवरील दोन महिला व एक इसम असे तिघेजण जागीच मृत्युमुखी पडले. मृतांची ओळख पटली नाही. अपघातानंतर स्कॉर्पिओ गाडी दोन-तीन वेळा पलटी झाल्याने त्यात उपमहाराष्ट्र केसरी अतुल पाटील (रा. लव्हे) हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी इंदापूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण बोराटे हे पुढील तपास करीत आहेत.