अमरावतीजवळील स्कूलव्हॅन अपघाताच्या चौकशीसाठी समिती
० मृतांच्या कुटुंबीयांना २ लाखांची मदत
० जखमींचा औषधोपचार राज्य सरकार करणार
अमरावतीजवळील स्कूलव्हॅन अपघाताच्या पाश्र्वभूमीवर विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय समितीवर चौकशीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या समितीला ८ दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. नवसारी येथील वळणमार्गावरील चौकात मंगळवारी एस.टी. मिनीबस आणि स्कूृल व्हॅनच्या धडकेत चार शाळकरी मुलांचा मृत्यू झाला होता. रात्री उपचारादरम्यान आणखी एका मुलाचा मृत्यू झाल्याने हा आकडा पाचवर पोहोचला आहे. नऊ जखमी विद्यार्थ्यांवर विविध खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
राज्य सरकारकडून मृतांच्या कुटुंबीयांना २ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे, तर जखमी मुलांच्या औषधोपचाराचा खर्चही राज्य सरकार करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या अपघाताची माहिती मिळताच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तातडीने मुंबईहून अमरावतीत पोहोचले. रात्री त्यांनी जखमी मुलांच्या पालकांची विचारपूस केली.
नवीन शालेय बस धोरणाची अंमलबजावणी परिवहन विभागाने केली असती, तर हा अपघात टाळता आला असता, अशी प्रतिक्रिया विखे पाटील यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर बोलताना दिली. या अपघाताची चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्त डी.पी. बन्सोड, जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल आणि पोलीस आयुक्त अजित पाटील यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. आठ दिवसात त्यांचा अहवाल मिळेल. या अपघातातील दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे विखे पाटील यांनी सांगितले. शाळा व्यवस्थापनही अशा घटनांसाठी जबाबदार असल्याचा ठपका त्यांनी ठेवला. केवळ शुल्क वसूल करण्याचा अधिकार या शाळांना नाही, तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारीही त्यांच्यावर आहे. निष्काळजीपणाबद्दल या शाळांच्या संचालकांविरोधात प्रथम माहिती अहवाल नोंदवण्यासही सांगण्यात आले आहे. सकृतदर्शनी परिवहन विभाग आणि वाहतूक पोलिसांचा निष्काळजीपणा यात दिसून आला आहे, पण चौकशीतून सर्व तथ्य बाहेर येतील, असे विखे पाटील यांनी सांगितले.अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या चार चिमुकल्यांवर त्यांच्या गावी मंगळवारी सायंकाळी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. उत्कर्ष निर्मळ आणि ओम पवार या दोघांवर वलगाव येथील पेढी नदीकाठच्या स्मशानभूमीत, सुजल देशमुख याच्यावर खारतळेगाव येथे, तर रोहित कुकडे याच्यावर कुंड सर्जापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज वलगाव येथे सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. खारतळेगाव आणि कुंड सर्जापूरही शोकमग्न झाले होते.
संग्रहित लेख, दिनांक 29th Nov 2012 रोजी प्रकाशित
आठ दिवसांत दोषींवर कारवाई करण्याचे पालकमंत्र्यांचे आश्वासन
अमरावतीजवळील स्कूलव्हॅन अपघाताच्या चौकशीसाठी समिती ० मृतांच्या कुटुंबीयांना २ लाखांची मदत ० जखमींचा औषधोपचार राज्य सरकार करणार अमरावतीजवळील स्कूलव्हॅन अपघाताच्या पाश्र्वभूमीवर विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय समितीवर चौकशीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
First published on: 29-11-2012 at 02:08 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Action should be taken in eight days on delinquent