शैक्षणिक वर्तुळात शाळा- महाविद्यालयांना विद्यार्थी मिळत नसल्याचे चित्र असले तरी न्याय वैद्यक (बी.एस्सी) संस्थेत प्रवेश मिळण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये चढाओढीनंतर प्रवेश निश्चित झाले आहेत. राज्यात पदवीचे शिक्षण देणाऱ्या केवळ तीन न्यायवैद्यक संस्था आहेत. नागपुरात न्यायवैद्यक संस्थेचे हे तिसरे वर्ष आहे. विज्ञान संस्थेतील रसायनशास्त्राच्या सहयोगी प्राध्यापक डॉ. अंजली रहाटगावकर न्याय वैद्यक संस्थेच्या समन्वयक म्हणून तीन वर्षांपूर्वी काम पाहत होत्या. त्यांनी ही संस्था नागपुरात आणण्यासाठी बरेच प्रयत्न केले होते.
सध्या या संस्थेकडे विद्यार्थ्यांचा ओघ वाढला असून विद्यमान प्रभारी संचालक डॉ. जयराम खोब्रागडे यांच्या नेतृत्वाखाली संस्थेने भरभराट केली आहे. संस्थेच्या तिसऱ्या वर्षांत बी.एस्सी प्रथम वर्षांच्या प्रवेशासाठी तब्बल ६७२ अर्ज आले. मात्र ५० जागा असल्याने केवळ तेवढय़ाच विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकला. संस्थेत प्रवेश घेणाऱ्या टॉपरला ८७.५ टक्के गुण आहेत. महत्त्वाचे म्हणजे खुल्या वर्गाचे प्रवेश ७४.८ टक्क्यावर पूर्ण झाले. अनुसूचित जातीचे ७१ टक्क्यावर, अनुसूचित जमातीचे ६५ टक्क्यावर तर इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे प्रवेश ७३ टक्क्यांवर पूर्ण झाले आहेत. पुढील वर्षी बी.एस्सी.ची (फॉरेन्सिक) पहिली तुकडी संस्थेतून बाहेर पडेल. संस्थेचे संचालक डॉ. जयराम खोब्रागडे म्हणाले, भविष्यात या शैक्षणिक शाखेची फार गरज पडणार आहे. सध्या मुंबई, औरंगाबाद आणि नागपुरातच हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. तिन्ही संस्था मिळून केवळ १५० जागा आहेत की ज्या वैद्यकीय विद्याशाखेपेक्षाही कमी आहेत. तिन्ही संस्था तेथील विज्ञान संस्थेत स्थापन करण्यात आल्या आहेत. आताच या संस्थेत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये मोठी स्पर्धा असते. सध्या तरी गुणवत्तेच्या निकषावर विद्यार्थ्यांना संस्थेत प्रवेश दिले जातात. समाजात होणाऱ्या गुन्ह्य़ांच्या तपासात पोलिसांना सहाय्यक म्हणून न्याय वैद्यक संस्थेचे विद्यार्थी महत्त्वाची जबाबदारी बजावतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिवाय इतर विद्याशाखेच्या बी.एस्सी.धारकांना प्रशासकीय सेवा किंवा संशोधन संस्थांमध्ये चांगला वाव आहे. पुढील वर्षीपासून पदव्युत्तर न्याय वैद्यक विभाग सुरू होणार असून शासनाने एम.एस्सी.साठी मान्यता दिली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडे संलग्निकरणासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. ती प्रक्रिया सुरू आहे, असे खोब्रागडे म्हणाले.