गेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला आठ जागा मिळाल्यामुळे ‘इनोव्हा’ पक्ष झाला होता आता या निवडणुकीत ‘नॅनो’ गाडीसारखी पक्षाची स्थिती राहील, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केली. 

भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांच्या प्रचारासाठी नागपूरचा वचनमाना प्रसिद्ध करण्यात आला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसमोर सध्या दुसरा कुठला विषय नसल्यामुळे प्रत्येक जाहीर सभेत नरेंद्र मोदी आणि भाजप या दोन विषयावर त्यांची भाषणे होत असतात. नरेंद्र मोदींवर उतावीळ झाले अशी टीका पवारांनी केली, खरे तर पवारच उतावीळ झाले आहेत. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी बसविण्यासाठी देशातील जनता उतावीळ झाली आहे. देशात मोदींची असलेली लाट बघता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये नैराश्य आले आहे. त्यामुळे त्यांना मोदीशिवाय दुसरा विषय नसल्यामुळे मिळेल त्या जाहीर सभेत ते टीका करीत असतात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या गेल्यावेळी आठ उमेदवार निवडून आले होते त्यामुळे इनोव्हा या एकाच गाडीत येत होते. यावेळी तर त्यांचे चारच उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्यांची स्थिती नॅनो गाडीसारखी होईल, अशी टीका फडणवीस यांनी केली.
शरद पवार पूर्वी अशा पद्धतीने बोलत नव्हते. मात्र, नैराश्यातून आता ते बोलत आहेत. सोनिया गांधी, शरद पवार आणि मुख्यमंत्री चव्हाण गुजरातवर टीका करीत असतात. मात्र, महाराष्ट्राच्या तुलनेत दुप्पट विकास गुजरातचा झाला आहे. चव्हाण यांनी मोदी यांना विकासकामावर चर्चा करण्याचे आव्हान देत असले तरी त्यांनी प्रथम महाराष्ट्रातील नेत्यांशी चर्चा करावी. रणजीमधील खेळाडूने आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडूंना आव्हान देणे हा त्यातलाच प्रकार आहे. स्वतचे महत्त्व वाढवून घेण्यासाठी चव्हाण यांना वारंवार मोदी यांना आव्हान देत असले तरी त्यातून मोदी यांची ताकद अधिक वाढत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाली आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली.
सोनिया आणि राहुल गांधी यांच्याजवळ देशपातळीवर काहीच व्हीजन नसल्यामुळे त्यांनी मोदीला लक्ष्य केले आहे. या काँग्रेसच्या टीकेमुळे मोदीकडे लोक अधिक आकिर्षत होऊ लागले. मोदी हे जनतेच्या मनातील हिरो असून ते राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे पंतप्रधान दावेदार असल्यामुळे त्यांना समोर केले जात आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल पटेल मोदी यांच्या छायाचित्राचा उपयोग करीत असल्यामुळे त्यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान बदलविण्याचा अपप्रचार केला जात आहे. मात्र, तसे काही होणार नाही, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. विलास मुत्तेमवार यांच्याकडे निवडणूक आयोगाने झडती घेतल्यानंतर त्यांनी केलेले आरोप हास्यास्पद असून ते नैराश्यातून केले आहेत. त्यांना पराभव दिसत असल्याने या ना त्या मार्गाने गडकरी यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असेही फडणवीस म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.