विकास कामांची इतकी घाई नेमकी कशासाठी ? महापालिकेची सत्ता हाती येऊन अवघ्या वर्षभराचा कालावधी लोटला आहे.  आपण काही जादूगार नाही. त्यामुळे चमत्काराची अपेक्षा ठेऊ नका, असे आपण पहिल्याच सभेत सांगितले होते. आधीच्या कारभाऱ्यांनी इतके नुकसान केलेले आहे की, ते दुरूस्त करून कामे करायला काहीतरी वेळ निश्चितपणे लागेल. किमान दोन वर्षांनंतर नाशिककरांना शहराचा विकास कसा होत आहे, ते
लक्षात येईल..
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनौपचारिक गप्पांदरम्यान व्यक्त केलेली ही भावना म्हणजे विकास कामे मूर्त स्वरूपात येण्याकरिता आणखी वर्षभराची मुदत वाढविण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वी त्यांनी मनसेला सत्तास्थानी येऊन किती दिवस झाले, याचे वारंवार दाखले देऊन जो पवित्रा स्वीकारला होता, त्याची पुनरावृत्ती यावेळीही झाल्याचे पहावयास मिळाले. उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघालेल्या राज यांनी बुधवारी शहर विकासाशी संबंधित प्रश्नांचा नेहमीप्रमाणे बंद दाराआड अवघ्या अध्र्या तासात धावता आढावा घेतला.
उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे व जळगाव येथे रवाना होण्यापूर्वी राज यांनी नाशिकला मुक्काम ठोकून बुधवारी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीकोनातून करावयाची कामे, रिंग रोडची प्रगती, गोदापार्क, गोदावरी प्रदूषण आदी विषयांवर महापौर अ‍ॅड. यतीन वाघ आणि पालिका
आयुक्त संजय खंदारे यांच्याशी चर्चा केली. महापौरांच्या रामायण निवासस्थानी ही छोटेखानी बैठक पार पडली. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी चर्चा करण्याचे टाळून त्यांनी शासकीय विश्रामगृहाकडे कूच केले. यामुळे बैठकीची माहिती महापौरांना द्यावी लागली.
मध्यंतरी सलग दोन वेळा राज यांनी विविध प्रश्नांवर चर्चा केली होती. त्या अनुषंगाने झालेल्या कार्यवाहीचा आढावा बैठकीत घेण्यात आला. सिंहस्थाची कामे करताना कायमस्वरूपी पायाभूत सुविधा निर्माण होतील, यावर कटाक्ष ठेवणे आवश्यक आहे. या दृष्टीकोनातून विकास कामांचे नियोजन व आराखडा तयार केला जावा, अशी सूचनाही त्यांनी केली. रिंगरोडसाठी जागा अधीग्रहीत करण्यास अडचणी येत असल्यास संबंधित जागा मालकांना टीडीआर किंवा जादा एफएसआय देऊन हा विषय मार्गी लावण्याची सूचना त्यांनी आधीच केली होती. त्यावर काय कार्यवाही झाली याची माहिती राज यांनी घेतली. गोदापार्कची किती जागा महापालिकेच्या ताब्यात आहे, याबद्दलही विचारणा केली. बंद दाराआड झालेल्या या बैठकीपासून मनसे व भाजपच्या नगरसेवकांनाही दूर ठेवण्यात आले.
बैठकीनंतर राज यांच्या वाहनांचा ताफा विश्रामगृहाकडे रवाना झाला. त्या ठिकाणी भाजपचे पदाधिकारी व नगरसेवकांशी त्यांनी चर्चा केली. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशीही अनौपचारिक गप्पा मारल्या. त्यावेळी त्यांनी मनसेच्या कारभारावर टिकास्त्र सोडणाऱ्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला. शहरात मनसेचे तीन आमदार व महापालिकेत पक्षाचीच सत्ता असली तरी विकास कामांसाठी काही अवधी द्यावा लागतो. जादुची कांडी फिरविल्याप्रमाणे अचानक सर्व काही बदलणार नाही. अशा चमत्काराची कोणी अपेक्षा ठेऊ नये, असे आपण आधीच सांगितले आहे.
किमान दोन वर्षांनंतर शहराचा विकास व्हायला लागल्याचे सर्वाच्या लक्षात येईल. एलबीटी अथवा जकात करापैकी कोणता पर्याय योग्य वाटतो, यावर त्यांनी शहराचा विकास ज्यात असेल, तो पर्याय चालेल असे सांगून स्पष्ट बोलण्याचे टाळले. राज यांनी नाशिकच्या या दौऱ्यात जाहीरपणे कोणतेही वक्तव्य करणे टाळले. काही महिन्यांपूर्वी पत्रकार परिषदेत प्रश्नांचा भडीमार झाल्यावर खुद्द राजही वैतागले होते. तेव्हापासून त्यांनी जाहीरपणे काही बोलण्यापेक्षा ‘आपण भले आणि आपले काम भले’ ही पद्धत अनुसरली आहे. यंदाच्या आढावा बैठकीत त्याचे प्रत्यंतर आले.