पंतप्रधान नरेंद्र मोदी व काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींच्या प्रचार सभेने ब्रम्हपुरीची लढत ‘हाय प्रोफाईल’ झाली आहे. येथे भाजपचे विद्यमान आमदार प्रा.अतुल देशकर, काँग्रेसचे माजी मंत्री व आमदार विजय वडेट्टीवार व राष्ट्रवादीचे संदीप गड्डमवार यांच्यात काटय़ाची लढत आहे. तिघांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने शेवटच्या २४ तासात मतदारांना आकर्षित करणाराच येथे विजयी होणार आहे.
ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघ अगदी सुरुवातीपासून ‘हाय प्रोफाईल’ राहिलेला आहे. चिमूरचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी मतदारसंघ बदलून ब्रम्हपुरीतून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांची थेट लढत भाजपचे आमदार प्रा.अतुल देशकर व राष्ट्रवादीचे नेते संदीप गड्डमवार यांच्याशी आहे. येथे एकूण २ लाख ५५ हजार ३३६ मतदार आहेत. पुरुषांच्या तुलनेत या एकमेव मतदारसंघात महिलांची संख्या तुलनेने अधिक आहे. १९७८ मध्ये बाबुराव भेंडारकर यांच्यानंतर ब्रम्हपुरीत कॉंग्रेसचा आमदार निवडून आलेला नाही, तसेच आजवर कॉंग्रेसला येथे ३० ते ३२ हजारावर मताधिक्य मिळालेले नाही. २००९ च्या निवडणुकीत राहुल ब्रिगेडचे पंकज गुड्डमवार यांचा दारुण पराभव झाला होता. अशाही स्थितीत वडेट्टीवार यांनी राजकीय जुगार खेळला आहे. वडेट्टीवारांनी अगदी पहिल्या दिवसापासूनच अतिशय आक्रमक पध्दतीने प्रचार सुरू केला आहे, परंतु चिमूर सोडून ब्रम्हपुरीत तुम्ही का आलात, या मतदारांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडे नाही. मात्र, अशाही स्थितीत वडेट्टीवारांनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची जाहीरसभा यश्स्वी करून दाखविल्याने निवडणूक रंगतदार वळणावर आलेली आहे.
कॉंग्रेसच्या मतविभाजनावर येथे १९९९ पासून भाजपा निवडून येत आहे. ९९ मध्ये उध्दवराव शिंगाडे, त्यानंतर २००४ पासून सातत्याने प्रा. अतुल देशकर विजयी होत आहेत. भाजपाचे जिल्हाध्यक्ष असलेले देशकर मृदू स्वभावाचे आहेत, परंतु दहा वर्षांत त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून कुठलेही ठोस काम केलेले नसल्याची मतदारांची नाराजी आहे. त्यामुळे विजयासाठी त्यांना संघर्ष करावा लागत आहे. भाजपला ही जागा धोक्याची वाटत असल्यानेच सोनिया गांधींच्या एक दिवस अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा झाली. सभेला प्रचंड गर्दी असली तरी मोदींचा आवाज बसल्याने अवघ्या सहा मिनिटांचेच भाषण झाले. त्यामुळे मोदींना ऐकण्यासाठी आलेल्यांचा हिरमोड झाला. राष्ट्रवादीचे संदीप गड्डमवार सलग दुसऱ्यांदा रिंगणात आहेत. वडील दिवं. वामनराव गड्डमवार यांची पुण्याई त्यांच्या पाठीशी आहे.
गेल्या निवडणुकीत ते केवळ ४ हजार मतांनी पराभूत झाले होते. तेव्हा त्यांना वडेट्टीवारांची साथ होती. यावेळी ते एकटेच किल्ला लढवित असले तरी ब्रम्हपुरीतील कॉंग्रेसचे बडे प्रस्थ अशोक भय्या यांची त्यांना साथ आहे. मतदारही गड्डमवार यांना संधी द्यायला हरकत नाही, असे बोलत आहेत. त्यामुळे ब्रम्हपुरीत कॉंग्रेस-भाजप-राष्ट्रवादी, असा त्रिकोणीय संघर्ष बघायला मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After sonia gandhi meet bramhapuri election are high profile
First published on: 14-10-2014 at 07:21 IST