ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालय तसेच इतर सर्व रुग्णालयांच्या कारभाराची पाहाणी करून चौकशी करण्याचे आदेश स्थायी समिती सभापती रवींद्र फाटक यांनी शुक्रवारच्या सभेत प्रशासनाला दिले. मात्र, दोन महिन्यांपूर्वीच सर्व साधारण सभेतही या संदर्भात चौकशी सुरू करण्यात आली होती, त्याचा अद्यापही अहवाल मिळालेला नसल्याने स्थायी समिती सदस्यांनी नाराजी व्यक्त करत प्रशासनाला जाब विचारला.
कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये ठाणेकरांना चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी नवीन यंत्र सामग्री खरेदी करण्यासंदर्भात आतापर्यंत सुमारे २५ प्रस्ताव मंजूर करण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात रुग्णालयामध्ये त्याची अंमलबजावणीच होत नसल्याचा आरोप स्थायी समिती सदस्य मीनाक्षी शिंदे यांनी केला. ठाणे महापालिकेच्या रूग्णालयामध्ये गरोदर महिलांना दाखल करण्यात येते. मात्र, डॉक्टरांकडून त्यांना सिझेरियन करण्याचा तसेच त्यासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जातो. त्यानुसार, नातेवाईक त्या महिलेला कळवा येथील रूग्णालयामध्ये घेऊन जातात. मात्र, रुग्णालयामध्ये बेड रिकामे असतानाही डॉक्टरांकडून बेड रिकामे नसल्याचे सांगण्यात येते. तसेच या डॉक्टरांकडून त्यांना आपल्या खासगी रुग्णालयात जाण्यास सांगितले जाते. पर्याय नसल्याने नातेवाईक महिलेला त्यांच्या रुग्णालयात घेऊन जातात, अशी माहिती स्थायी समिती सदस्य तसेच सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी सभेत दिली.
गरोदर महिलांना आपल्या खासगी रुग्णालयांमध्ये पाठविण्यासाठी डॉक्टर असे प्रकार करीत असल्याचा आरोप करीत त्यांनी या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली. त्यानुसार, स्थायी समितीचे सभापती रवींद्र फाटक यांनी कळवा रुग्णालय तसेच इतर रुग्णालयाच्या कारभाराची पाहाणी करून चौकशी करण्याचे आदेश दिले. मात्र, कळवा रुग्णालयाच्या कारभाराविषयी सर्वसाधारण सभेत चौकशी सुरू करण्यात आली होती. त्याचे अद्यापही अहवाल मिळालेला नाही, असे असतानाही पुन्हा चौकशी लावण्यात आल्याने सदस्य सुधाकर चव्हाण यांनी नाराजी व्यक्त करत प्रशासनाला धारेवर धरले.