अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ६ जानेवारीपासून राज्यभरातील अंगणवाडी कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. सोमवारी येथील शिवाजीमहाराज पुतळ्याजवळ या कर्मचाऱ्यांनी थाळीनाद आंदोलन केले. मात्र, आंदोलनाची जिल्हा प्रशासनाकडून दखल घेतली न गेल्याने संतप्त झालेल्या आंदोलनकर्त्यां महिला कर्मचाऱ्यांनी रास्ता रोको केले.
अंगणवाडी सेविका मदतनीसांना सेवा समाप्तीनंतर एकरकमी लाभ द्यावा, एका महिन्याच्या मानधनाऐवढी रक्कम भाऊबीज भेट द्यावी, मानधनात इतर राज्यांप्रमाणे वाढ करावी, एका महिन्याची उन्हाळी सुटी जाहीर करावी, आदी मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या निर्णयानुसार दोन लाख अंगणवाडी कर्मचारी ६ जानेवारीपासून बेमुदत संपावर गेले आहेत. संपकाळात अंगणवाडी कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. सोमवारी राज्य अंगणवाडी-बालवाडी कर्मचारी युनियन लालबावटाच्या राज्य सरचिटणीस अॅड. माधुरी क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शनिवार बाजार येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढला. शिवाजी पुतळ्याजवळील मदानावर मोर्चा विसर्जित केल्यानंतर कर्मचाऱ्यांनी थाळीनाद आंदोलन केले. दुपापर्यंत जिल्हा प्रशासनाकडून आंदोलनाची दखल घेतली नसल्याने संतप्त कर्मचाऱ्यांनी रास्ता रोको केला. दुपारी एक वाजता व पुन्हा ३ वाजता महिलांनी रास्ता रोको केले. जिल्हाधिकाऱ्यांना आंदोलनस्थळी बोलवा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी लावून धरली. या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणय अशोक यांच्या मध्यस्थीनंतरही आंदोलक शांत झाले नव्हते. मोठा पोलीस बंदोबस्त तनात होता. दोन वेळेस रस्ता बंद झाल्याने मुख्य रस्त्यावरील वाहतूक दुसऱ्या बाजूने वळविली होती. जिल्हाधिकाऱ्यांना दोन दिवसांपूर्वी निवेदन देण्यास महिला कर्मचारी गेल्या असता त्यांना वेळ नसल्याचे सांगून जिल्हाधिकाऱ्यांनी भेट नाकारली. कॉ. राजन क्षीरसागर, जिल्हा सचिव अर्चना कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष राजश्री गाढे, रत्नमाला कदम, वंदना नाटकर, रेखा पानपट्टे आदी उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 14th Jan 2014 रोजी प्रकाशित
अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे थाळीनाद आंदोलन
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ६ जानेवारीपासून राज्यभरातील अंगणवाडी कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. सोमवारी येथील शिवाजीमहाराज पुतळ्याजवळ या कर्मचाऱ्यांनी थाळीनाद आंदोलन केले.

First published on: 14-01-2014 at 01:40 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Agitation of anganwadi worker ignore administration parbhani