बेकायदा बांधकामांवरील कारवाई रोखली जावी, यासाठी पुकारण्यात आलेल्या बंदच्या आवाहनाला सर्वसामान्य ठाणेकर जुमानत नाहीत हे पाहून गुरुवारी या बंदचे प्रवर्तक एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड या द्वयीने ठाणे परिवहन उपक्रमाच्या बस आगारांवर ठाण मांडत ठाणेकरांची ‘लाइफलाइन’ रोखून धरली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्रितपणे पुकारलेल्या बंदला अक्षरश: धाब्यावर बसवून सर्वसामान्य ठाणेकरांनी सकाळपासूनच रेल्वे स्थानकाचा रस्ता धरला. अधूनमधून येणाऱ्या टीएमटीच्या बसगाडय़ा तसेच रिक्षांचा आधार घेत ठाणेकर इच्छितस्थळी पोहोचण्याचा प्रयत्न करीत होते. हे लक्षात येताच शिवसेना नेत्यांनी टीएमटी बसेस ज्या आगारातून बाहेर पडतात तेथेच आपला मोर्चा वळविला. टीएमटीच्या अर्ध्याहून अधिक बसेस वागळे आगारातून बाहेर पडतात. या आगारात शिंदे-आव्हाड जोडगोळीने ठाण मांडले आणि उशिरापर्यंत एकही बस बाहेर पडू दिली नाही. विशेष म्हणजे, आगाराच्या वेशीवर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात असताना शिंदे-आव्हाडांची दबंगगिरी मात्र बिनधोकपणे सुरू होती.
ठाणे परिवहन उपक्रमामध्ये शिवसेनेची कामगार संघटना आहे. त्यामुळे टीएमटीच्या बसेस आगाराबाहेर पडू नयेत, यासाठी वाहक-चालकांवर बुधवारी रात्रीपासूनच दडपण होते. ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील सॅटीस पुलावरील एका टीएमटी बसवर दगडफेक करत बुधवारी मध्यरात्री आंदोलकांनी घबराट पसरविण्याचा प्रयत्न केला. टीएमटीच्या ताफ्यात तीनशेपेक्षा अधिक बसेस असून त्यापैकी २२० बसेस दररोज वेगवेगळ्या मार्गावर धावत असतात. यापैकी वागळे आणि कळवा येथे टीएमटीचे मोठे आगार असून तेथून या बसगाडय़ांचे परिचालन होत असते. बेकायदा बांधकामांविरोधात पुकारलेल्या बंदला सर्वसामान्य ठाणेकर पाठिंबा देतील, अशी अपेक्षा बाळगून असलेल्या शिवसेना आणि दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांचे सकाळचे दृश्य पाहून काहीसा भ्रमनिरस झाला. जोरजबरदस्तीने ठाणे, कळवा, मुंब्रा भागांतील दुकाने बंद करूनही ठाणेकरांची रेल्वे स्थानकांच्या दिशेने कूच सुरू आहे हे पाहून या पक्षांचे नेते आक्रमक बनले. दुपारी उशिरापर्यंत टीएमटीच्या वागळे आणि कळवा आगारातून १५२ बसेस आगाराबाहेर पडल्या होत्या. त्यामुळे कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या ठाणेकर प्रवाशांना वाहतुकीसाठी काही प्रमाणात पर्याय उपलब्ध होत होता. त्यामुळे संतापलेले शिवसेनेचे आमदार एकनाथ िशदे यांनी राजन विचारे यांना सोबत घेत थेट वागळे आगारात धडक दिली. एकनाथराव आले आहेत पाहून आगारातील शिवसेनाप्रणीत कामगारांनाही जोर आला आणि आगाराबाहेर बस नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रामाणिक बसचालकांना दमबाजीचे प्रकार घडू लागले. यानंतर दुपारी उशिरापर्यंत शिंदे, विचारे आणि जितेंद्र आव्हाड टीएमटीचे व्यवस्थापक देविदास टेकाळे यांच्या कार्यालयात ठाण मांडून बसले होते. या वेळी पोलिसांना कडक बंदोबस्त आगारात होता. प्रवाशांच्या सोयीसाठी बसेस बाहेर पडाव्यात यासाठी हा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र, शिंदे-आव्हाड-विचारे या आमदारांचे त्रिकूट व्यवस्थापकांच्या केबिनमध्ये ठाण मांडून बसल्याने एकही बस आगाराबाहेर काढण्याची िहमत तेथील वाहक-चालकांना दाखविता आली नाही. टीएमटी व्यवस्थापकांशी चर्चा सुरू आहे, असे भासवून एक प्रकारे आगारात दबंगगिरीचे दर्शनच हे आमदार घडवीत होते. विशेष म्हणजे, आगाराबाहेर सुरक्षितपणे बस काढण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर होती ते पोलीस हे सगळे उघडय़ा डोळ्यांनी पाहत होते. एकूणच बंदच्या निमित्ताने सगळा जबरदस्तीचा मामला ठाण्यात सुरू होता.
मदतीसाठी शिंदेंकडून आव्हाडांचा धावा
टीएमटी बसगाडय़ांचे प्रवर्तन सुरू करावे यासाठी व्यवस्थापक टेकाळे यांची भेट घेण्यासाठी आलेले मनसेच्या कार्यकर्त्यांनी आमदार शिंदे आणि विचारे यांच्यासमोरच टेकाळे यांच्या केबिनची काच फोडली. त्यामुळे वातावरण काहीसे तंग बनले होते. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे संतप्त बनलेल्या एकनाथ शिंदे यांनी मनसेचे शहर अध्यक्ष नीलेश चव्हाण यांच्यावर आवाज चढवतच केबिनबाहेर काढले. विशेष म्हणजे, मनसैनिकांचा एक गट आक्रमक होताच शिंदे यांनी ‘बंटी कुठे आहे’ (जितेंद्र आव्हाड), असा धावा केल्याने शिवसैनिकही अचंबित झाले.