विज्ञान शाखेच्या द्वितीय वर्ष पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना गैरहजर दाखविण्याचा प्रताप पुणे विद्यापीठाने केला आहे. त्यामुळे फग्र्युसन महाविद्यालयातील १४० विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.
परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. विद्यापीठाच्या निकालामध्ये विद्यार्थी परीक्षेला बसलेले असतानाही गैरहजर दाखवून अनेक विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण करण्यात आले आहे. हे निकाल बदलण्यासाठी विद्यार्थ्यांनी निकालपत्रे महाविद्यालयाच्या कार्यालयात दिली. बदलण्यासाठी देण्यात आलेली निकालपत्रे १४ फेब्रुवारीपर्यंत महाविद्यालयामध्ये पोहोचलेली नाहीत. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर नोंदविण्यात आलेल्या माहितीनुसार द्वितीय सत्र पदवी परीक्षेचे संगणकीकृत अर्ज भरण्याची अंतिम तारीख १५ फेब्रुवारी आहे. विद्यार्थ्यांच्या हातामध्ये निकालपत्रे नसल्यामुळे त्यांना शुक्रवारी संपलेल्या अंतिम मुदतीपर्यंत परीक्षा फॉर्म भरणे शक्य झालेले नाही. वेळेमध्ये फॉर्म भरून न झाल्यामुळे विद्यार्थ्यांची कोणतीही चूक नसताना विद्यापीठाकडून विलंब शुक्ल आकारले जाण्याची शक्यता आहे, अशी कैफियत १४० विद्यार्थ्यांनी मांडली आहे.
या सर्व कार्यप्रणालीमध्ये विद्यार्थ्यांचे आर्थिक, शैक्षणिक आणि महत्त्वाचे म्हणजे वेळेचेही नुकसान होत आहे. विकासाच्या दृष्टिकोनातून विद्यापीठाने घेतलेल्या निर्णयांना विद्यार्थी सदैव सहकार्य करतात. त्यामुळे आमच्या या विषयावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी करणारे साकडे या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रकांकडे घातले आहे.