तालुक्यात ७२ टँकरने ६३ गावे व २९४ वाडय़ा-वस्त्यांवर पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यासाठी २२३ खेपा मंजूर असून त्यातील २१५ खेपा रोज पूर्ण होतात असे दाखवण्यात येत असले तरी प्रत्यक्षात वाडय़ा वस्त्यांवर चार ते पाच दिवस टँकर मिळत नाहीत. ग्रामसेवक व टँकरचालकांच्या संगनमताने हा सर्व प्रकार होत असल्याचे निदर्शनास आले आहे. जिल्ह्य़ात सर्वत्र टँकरच्या खेपांबाबत जिल्ह्य़ात सर्वत्र बोंब सुरू असताना कर्जत तालुक्यात मात्र ९८ टक्के खेपांचा दावा कसा केला जातो, याचा उलगडा त्यामुळे होऊ शकेल.
तालुक्यातील मलठण, आनंदवाडी, राक्षसवाडी बुद्रक व खुर्द, नवसरवाडी, डोमाळवाडी, चिंचोली काळदात व डीक्सळ या गावांचे टँकरचे प्रस्ताव अद्यापि प्रलंबित आहेत. उर्वरित टँकर सुरू आहेत. तालुक्यात टँकरच्या खेपा रोज ९८ टक्के होत आहेत असे सांगतात. त्यांना ही माहिती तालुक्यातील सर्व ग्रामसेवकांकडून दिली जाते. वस्तुस्थिती अशी आहे की, ही माहितीच चुकीची आहे. गावोगावचे ग्रामसेवक व टँकरचालकांनी संगनमत करून हे चित्र रंगवले आहे. तालुक्यात टँकर भरण्यासाठी दूरगाव ५४ खेपा, खेड १७ खेपा, भावडी ३१ खेपा, मांदळी ६६ खेपा व गणेशवाडी ११ खेपा, पिंपळवाडी २९, मांगी १५ खेपा होतात. या उद्भवाच्या ठिकाणी सर्व ग्रामसेवकांनी एक खासगी व्यक्तीची नेमणूक केली आहे. ही व्यक्ती शिसपेन्सीलने टँकरची नोंद करते व फोनवरून पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली जाते. शिवाय टँकर भरून गेल्यानंतर निर्धारित स्थळी जाण्याआधी मध्येच  त्यातून पाणी विक्री केली जाते. वाडय़ा वस्त्यांवर पाणी साठवण्यासाठी वस्तीच्या समोर रस्त्यावर छोटे बॅरल किंवा टिपाड मांडण्यात येतात. पुरेसे पाणी साठवण्याची व्यवस्था नसल्याने पाणी शिल्लक ठेवून टँकरचालक त्याची विक्री करतात. त्याकडे अधिकारी व पदधिकाऱ्यांचे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष आहे.