स्थळ – म्हसरूळ येथील भास्कर सोसायटी. वेळ – साधारणत: रात्री सात ते आठची.
महिला वर्ग स्वयंपाकाच्या गडबडीत अडकलेला.. पुरूष मंडळी दुरचित्रवाणीवरील कार्यक्रमात तर बच्चे कंपनी आपल्याच विश्वात दंग..  त्याचवेळी सोसायटीतील एका सदनिकेतून अचानक आरडाओरड ऐकू येतो.. एक महिला आवाजाच्या दिशेने धाव घेते.. समोर गॅस रेग्युलेटरने पेट घेतलेला.. क्षणाचाही विलंब न करता संबंधित महिला पेटते सिलिंडर घराबाहेर काढून संभाव्य दुर्घटना टाळते. हे प्रसंगावधान दाखविणाऱ्या लिला कोकरे यांना या कामगिरीबद्दल महापालिकेने शौर्य पुरस्काराने सन्मानित केले आहे.
म्हसरूळच्या वाढणे कॉलनीतील भास्कर सोसायटीत वास्तव्यास असणाऱ्या चंद्रभागा गायकवाड यांच्या घरात हा प्रकार घडला. सायंकाळची महिला वर्गातील गप्पाष्टके संपल्यानंतर त्या आपापल्या घरी परतल्या. स्वयंपाकाची गडबड सुरू असतानाच एकदम त्यांना काही विचित्र वास आला. इकडे तिकडे पाहिले असता ओटय़ाच्या खालील सिलिंडरच्या रेग्युलेटरने पेट घेण्यास सुरूवात केली होती. भयभित होऊन त्यांनी मदतीसाठी आरडाओरड केली. हा आवाज ऐकून शेजारील लिला कोकरे यांनी त्यांच्या घरात धाव घेतली. स्वयंपाकघरात रेग्युलेटर चांगलेच पेटले होते. आग विझविण्यासाठी काही मिळते का याची शोधाशोध सुरू असताना त्यांनी धैर्याने पेटलेले रेग्युलेटर सिलिंडरपासून वेगळे करत ते प्रथम घराबाहेर नेले. सिलिंडर बाहेर नेण्यासाठी शेजारील काही जणांची मदत झाली. सर्वानी मिळून मग मोकळ्या मैदानात सिलिंडर नेऊन त्याच्यावर नळीद्वारे पाणी टाकले आणि आग विझविण्यात यश मिळविले.
सर्व काही नियंत्रणात आल्यावर कोकरे यांनी भयभित झालेल्या गायकवाड यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. सदनिकेतील इतर नागरिकांनी कोकरे यांच्या प्रसंगावधानाचे कौतुक केले. वरकरणी हा साधा प्रसंग वाटत असला तरी, कोकरे यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानाने इमारतीतील २२ कुटुंबिय सुरक्षित राहिले. आग वेळेत नियंत्रणात आली नसती तर सिलिंडरचा स्फोट झाला असता. त्यांच्या कामगिरीची दखल घेत वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्थांनी कोकरे यांचा सत्कार केला. नाशिक महापालिकेने त्यांना शौर्य पुरस्काने सन्मानित केले. आग लागली तेव्हा ती विझवायची, कुठल्याही प्रकारचे नुकसान न होऊ देता इतकंच आपल्या डोक्यात होते. त्यानुसार आपण केवळ कृती केली अशी कोकरे यांची प्रतिक्रिया.