वाढीव मानधन व कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्यावे, या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवारपासून अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी महापालिका कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनास सुरुवात केली. आपल्या मागण्यांचे निवेदन आंदोलकांनी महापौरांना सादर केले.
शहरात पालिकेच्या सहकार्याने ४१९ अंगणवाडय़ा सध्या सुरू आहेत. त्यात मुख्यसेविका, सेविका व मदतनीस असे एकूण ८५० कर्मचारी गेल्या २० वर्षांपासून काम करीत आहे. पालिकेमार्फत देण्यात येणारे मानधन अत्यल्प आहे. यामुळे अनेक सेविका व मदतनीसांनी काम सोडून दिल्याने सध्या अपुऱ्या मनुष्यबळाचा सामना करावा लागत आहे. त्यातच, उपलब्ध अंगणवाडी सेविकांकडून वेळोवेळी आर्थिक गणना, जनगणना, मतदान, कुष्ठरोग लसीकरण, पल्स पोलिओ, दारिद्य््रारेषेखालील सव्‍‌र्हेक्षण आदी कामे करून घेतली जातात. या कामांची वरिष्ठांकडून आजवर कुठल्याही प्रकारची दखल घेतली गेली नसल्याची तक्रार आंदोलकांनी केली. आगामी कुंभमेळ्याच्या पाश्र्वभूमीवर, अंगणवाडी सेविका तसेच कर्मचाऱ्यांना चतुर्थश्रेणीत सामावून घेतले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. अंगणवाडी सेविकांना वाढीव मानधन व कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्यावे, ही मागणी प्रलंबित आहे. यावर सकारात्मक निर्णय होईपर्यंत अंगणवाडी सेविकांकडून कामकाज सांभाळून पालिका मुख्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला. या बाबतचे निवेदन महापौर, उपमहापौर, विविध पक्षांचे गटनेते, सभागृह नेते, स्थायी समिती आदींना सादर करण्यात आले.