भीमशक्ती संघटना दलित बहुजन कामगार व गोरगरीब जनतेच्या प्रश्नावर गेल्या दशकापासून लढा देत असून, यापुढेही त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा सुरू ठेवू, असे प्रतिपादन भीमशक्तीचे अध्यक्ष तथा माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी केले.
अरुण बोर्डे व माजी सभापती माणिक साळवे यांचा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. या वेळी आमदार हंडोरे बोलत होते. भीमशक्ती ही सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक अन्यायाविरोधात लढणारी संघटना आहे. युवा नेते बोर्डे व साळवे यांनी समर्थकांसह भीमशक्ती संघटनेत प्रवेश केल्यामुळे संघटनेचे बळ निश्चितच वाढले आहे. भीमशक्तीच्या कार्यकर्त्यांला काँग्रेसची ध्येयधोरणे पटली तर तो काँग्रेसमध्ये काम करू शकतो. कारण भीमशक्ती संघटना सामाजिक असून काँग्रेस हे राजकीय संघटन आहे, असे हंडोरे यांनी स्पष्ट केले.
हंडोरे म्हणाले, की मंत्रिपदावर असताना राज्यातील ७ विभागीय ठिकाणी १ हजार विद्यार्थी राहतील अशी वसतिगृहे बांधली. तालुक्याच्या ठिकाणी निवासी शाळा, वसतिगृह तसेच राज्यातील प्रत्येक जिल्हय़ात आंबेडकर भवन बांधण्याचा निर्णय घेतला.
बहुतांश जिल्हय़ांत आंबेडकर भवन उभारले गेले आहे. भीमशक्तीचे प्रदेश सरचिटणीस प्रकाश जावळे, मराठवाडा अध्यक्ष जालिंदर शेंडगे यांची भाषणे झाली.