राज्यातील अंगणवाडी सेविकांच्या संपास १५ दिवस लोटूनही शासनाने काहीच दखल न घेतल्याच्या निषेधार्थ संघटनेने २४ जानेवारीपासून भीक मागो आंदोलनाची घोषणा करीत लढा तीव्र करण्याचे स्पष्ट केले आहे.
राज्यातील हजारो अंगणवाडी सेविका व मदतनीस विविध मागण्यांसाठी सहा जानेवारीपासून बेमुदत संपावर आहेत. त्यामुळे अंगणवाडीत चालणारे सर्व कार्य ठप्प पडले आहे. मागण्यांची पूर्तता करण्यासाठी पैसे नाहीत अशी भूमिका शासनाने घेतल्याने २४ जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयापुढे भीक मागो आंदोलन करण्याचे सिटू या कामगार संघटनेचे नेते यशवंत झाडे यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले की, राज्यात शून्य ते सहा या वयोगटातील मुलांना प्राथमिकपूर्व शिक्षण देण्याचे कार्य करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना पल्स पोलिओ, न्यायालयीन समन्स देणे, गरोदर मातांची नोंदणी, पोषण आहार अशी व अन्य कामे पार पाडावी लागतात.
 नियमित शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे काम करणाऱ्या या कर्मचाऱ्या मात्र दोन ते चार हजार रुपयांपर्यंत अल्प मानधन मिळते. त्यांना शासकीय दर्जा नाही, असे संघटनेने निदर्शनास आणले.
वरील सर्व मागण्यांच्या पाश्र्वभूमीवर संघटनेने सेविकांना मासिक दहा हजार व मदतनिसांना मासिक साडे सात हजार रुपये मानधन मिळण्याची मागणी प्रामुख्याने केली आहे.
तसेच सेवा समाप्तीचा एकरकमी लाभ एप्रिल २००५ पासून मिळावा, आयसीडीएस योजनेचे खासगीकरण रद्द करावे, रिक्त जागांची भरती, प्रलंबित प्रवास खर्चाची व अन्य बिले त्वरित मिळावी अशा मन्य मागण्या केल्या आहेत.
अनेक कर्मचाऱ्यांना विविध सवलती, उद्योगांना मदत देणाऱ्या शासनाकडे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देण्यासाठी पैसे नसल्यानेच आम्हांवर आता भीक मागो आंदोलनाची वेळ आली असल्याची भूमिका यावेळी संघटनेने मांडली.