काळे मांजर आडवं गेले तर काम होत नाही.. लिंबू-मिरची घरावर बांधली की भूतबाधा होत नाही.. आरतीच्या वेळी समोरच्या मावशी धापा टाकल्याप्रमाणे आवाज काढत विक्षिप्तसारख्या वागायला लागतात..  विद्यार्थी दशेतील अशा अनेक शंका-कुशंकाचे समाधान करण्यासाठी अंधश्रध्दा निर्मूलन समितीने (अंनिस) वैज्ञानिक जाणिव प्रकल्पाच्या माध्यमातून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. जिल्ह्यात या उपक्रमाद्वारे आजवर २५० हून अधिक शाळांमध्ये अंनिस पोहचले असून विद्यार्थ्यांसाठी महिन्यातून एकदा मार्गदर्शन वर्ग सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे.
आपल्याकडे पूर्वापार चालत आलेल्या भ्रामक कल्पनेतून अनेक समज-गैरसमज पसरलेले आहेत. विद्यार्थी अवस्थेत त्यातील फरक समजला नाही तर भावी पिढी श्रध्दा आणि अंधश्रध्देच्या विळख्यात सहजपणे सापडू शकते. भावी पिढी आणि त्यांना घडविणारा घटक म्हणजे ‘शिक्षक’ यांचे प्रबोधन करण्यासाठी अंनिस गेल्या १८ वर्षांपासून वैज्ञानिक जाणिव प्रकल्पाच्या माध्यमातून कार्यरत आहे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रूजविताना त्यांच्या शंका वा प्रश्नांचे योग्य निराकरण होणे गरजेचे आहे. यासाठी शिक्षकांना ती संकल्पना प्रथम समजणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन अंनिसने मान्यवर शास्त्रज्ञ, त्या त्या विषयातील तज्ज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक, माध्यमिक तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विशेष अभ्यासक्रम सुरू केला. या तिन्ही गटांसाठी श्रध्दा-अंधश्रध्दा म्हणजे काय, वैज्ञानिक दृष्टिकोन, अंगात येणे-भानामती वा भुतबाधा, फलज्योतीषशास्त्र का नाही, संत व समाजसुधारकांचा वैज्ञानिक दृष्टिकोन हे विषय निश्चित केले. मात्र सध्या संत व समाजसुधारक या विषयाची व्याप्ती वाढवली असून आता हा विषय ‘अर्वाचिन काळातील संत  ते २१ व्या शतकातील समाजसुधारक’ असा आहे. या विषयातून संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा ते डॉ. नरेंद्र दाभोळकर आदींच्या कार्याचा परिचय, त्यांनी विज्ञानावर आधारीत केलेले काम यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले. तसेच श्रध्दा व अंधश्रध्देतील पुसट रेषा कशी असते, वैज्ञानिक दृष्टिकोन ही संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करणे, अंगात येणे-भानामती वा भुतबाधा म्हणजे नेमके काय, त्यामागील मानसिकता, खगोल शास्त्राच्या आधारे फलज्योतीष शास्त्र का नाही याची कारणमिमांसा करण्यात आली आहे. वयोगटानुसार त्या विषयावर माहिती देऊन मार्गदर्शन केले जाते. मात्र प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांचा बुध्यांक, त्यांची मानसिकता लक्षात घेऊन त्यांना प्रात्यक्षिकाच्या मदतीने मार्गदर्शन केले जाते. यासाठी प्राथमिक स्तरावर सत्यशोध परिचय, माध्यमिकसाठी सत्यशोध प्रज्ञा आणि महाविद्यालयासाठी सत्यशोध प्रबोध या तीन परीक्षा घेण्यात येतात. शिक्षकांसाठी आयोजित सत्रात सखोल माहिती, त्यामागील शास्त्र, शास्त्रीय कारणे यावर भर देण्यात येत आहे.
अंनिसचे हे काम २-५ दिवसीय शिबीर, मार्गदर्शन वर्गाच्या माध्यमातून जिल्हा तसेच तालुका स्तरावर सध्या सुरू आहे. आजवर अंनिसने अंधश्रध्दा, वैज्ञानिक दृष्टीकोन या टप्प्यावर काम केले. आता पुढील काळात प्रकल्पाच्या माध्यमातून ‘जात’ यावर लक्ष केंद्रीत करत जात पंचायतीला मूठमाती हा उपक्रम हाती घेतला गेला आहे. तसेच विद्यालयीन स्तरावर नाशिक शाखेच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी महिन्यातून एकदा मार्गदर्शन वर्ग सुरू करण्यात येणार आहे. चमत्कार म्हणजे काय, ते कसे घडतात, त्यामागील कारणांचा शोध यावर भर देण्यात येणार असल्याची माहिती महेंद्र दातरंगे यांनी दिली. नाशिककरांचा अंनिसच्या उपक्रमांना नेहमीच उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. सध्या सुधीर धुमाळ, डॉ. ठकसेन गोराणे, कृष्णा चांद्रगुडे, प्रा. सुरेश घोडेराव आणि महेंद्र दातरंगे अंनिसचे कार्यक्रम राबवत आहेत.