पत्रकारांना संरक्षण देणारा कायदा लागू करण्यात यावा, या मागणीसाठी पत्रकार हल्लाविरोधी कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी लाक्षणिक उपोषण करण्यात आले. सरकारने पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्याला प्रतिबंध करण्यासाठी या स्वरूपाचा कायदा ‘दर्पण’दिनापूर्वी लागू करावा, अशी आग्रही मागणी या वेळी करण्यात आली.
जिल्हाधिकाऱ्यांना या वेळी निवेदन देण्यात आले. पत्रकारांवर गेल्या काही वर्षांपासून सातत्याने हल्ले होत आहेत. सर्वसामान्यांवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी कटिबद्ध असणाऱ्या पत्रकारांवर वारंवार हल्ले होत आहेत. या बाबी गंभीर असून पत्रकारांना संरक्षण देणारा कडक कायदा करण्याची मागणी करण्यात आली. ज्येष्ठ पत्रकार हेमराज जैन, विजय जोशी, कृ. ना. मातेकर, परवेज हाश्मी यांच्यासह जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नितीन धुत, माजी अध्यक्ष संतोष धारासुरकर, आसाराम लोमटे, कार्याध्यक्ष अशोक कुटे, प्रदेश प्रतिनिधी रमाकांत कुलकर्णी, सरचिटणीस प्रवीण देशपांडे, कोषाध्यक्ष सूरज कदम, जिल्हा संपादक संघटनेचे कार्याध्यक्ष रमेशराव गोळेगावकर आदी या वेळी उपस्थित होते.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विजय भांबळे, माजी जिल्हाध्यक्ष विजय वरपुडकर, महापौर प्रताप देशमुख, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश देशमुख, मनपाचे विरोधी पक्षनेते भगवान वाघमारे, शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब जाधव, सुधाकर खराडे आदींनी भेट देऊन पत्रकारांच्या मागणीला पाठिंबा दर्शविला.