* जिल्हा रुग्णालयात अव्यवस्था  
* आरोग्यमंत्र्यांना भाजपचा इशारा
जिल्हा सामान्य रुग्णालयात कमालीची अव्यवस्था आहे. रुग्णांचे हाल पाहण्यासाठी राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी या रुग्णालयाला भेट द्यावी, अन्यथा आम्हीच मुंबईला जाऊन आरोग्यमंत्र्यांची भेट घेऊ आणि त्यांचे स्वास्थ्य बिघडवू, असा इशारा भाजपने दिला आहे.
भाजपच्या वतीने आज दुपारी १ वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर तीव्र निदर्शने करणत आली. या आंदोलनाचे नेतृत्व किशोर जोरगेवार, तुषार सोम, राजेंद्र अडपेवार, बलराम डोडानी, अंजली घोटेकर, हिरामण खोब्रागडे, विनोद शेरकी, सरिता बेडेकर या प्रभृतींनी केले. रुग्णांची होणारी गैरसोय विशद करतांना जोरगेवार यांनी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. रुग्णांना संगणकीकृत चिठ्ठी देण्यात येत नाही, रुग्णांच्या नातेवाईकांना बसण्यासाठी जागा नाही, अपुरे कर्मचारी, रुग्णालयात पिण्याच्या पाण्याची सोय नाही, औषधसाठा उपलब्ध नाही, सिटी स्कॅन मशीन तीन वर्षांंपासून बंद आहे, एक्स-रे मशिन वष्रेभरापासून बंद असून एक्स-रे अहवाल सुध्दा दिला जात नाही, रुग्णालयातील उशांना खोळ नाहीत, बेडशीट उपलब्ध नाहीत, सर्व वॉर्ड अस्वच्छ असून झोपेच्या गोळ्या व पेनकिलरसारखी औषधे रुग्णांना बाहेरून आणायला सांगितली जातात. रुग्णालयात आवश्यक पॅड, फॅक्चर पॅड उपलब्घ नाही. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या पीडितांवर योग्य उपचार केले जात नाहीत. जळालेल्या रुग्णांसाठी वातानुकुलित कक्ष नाही. सिझेरियन झालेल्या स्त्रियांसाठी विश्रांती कक्ष नाही. अशा विविध समस्यांचा पाढा जिल्हा शल्यचिकित्सक सोनुने यांच्यासमोर वाचण्यात आला.
चंद्रपूर औद्योगिक जिल्हा असून येथे वेकोलिसह अनेक लहान-मोठे उद्योग आहेत. त्यामुळे प्रदूषण प्रचंड प्रमाणात वाढले आहे. ह्रदयविकार, श्वसनरोग, नेत्रविकार, त्वचारोग, कॅन्सर आदी गंभीर आजार दिवसेंदिवस वाढत आहेत. अशा परिस्थितीत सर्व सोयी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. आठवडय़ाभरात या सर्व समस्या निकाली निघाल्या नाहीत, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी मनपाचे झोन सभापती रवी गुरूनुले, वनश्री गेडाम, विशाल निंबाळकर, कल्पना बगलकर उपस्थित होते.