महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गाडीच्या ताफ्यावरील दगडफेक प्रकरणात आरोपी असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संग्राम जगताप, युवक राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष किरण काळे व अन्य ५ जण आज भिंगार पोलीस ठाण्यात हजर झाले. त्यांना अटक करून दुपारी न्यायालयात नेण्यात आले. तिथे न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर प्रत्येकी १५ हजार रूपयांच्या वैयक्तीक जातमुचलक्यावर त्यांची सुटका झाली.
नगरसेवक अरीफ शेख, समदखान तसेच मतीन सय्यद, अस्लम शेख, मुजाहिदीन कुरेशी अशी अन्य आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह अन्य ७० जणांवर भिंगार पोलिसांनी ठाकरे यांच्या निषेध प्रकरणात दंगलीचा तसेच सरकारी कामकाजात अडथळा आणण्याचा गुन्हा दाखल केला होता. त्यांच्याबरोबरच मनसेच्या कैलास गिरवले, किशोर डागवाले, सचिन डफळ व अन्य सुमारे १०० जणांवरही असाच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी झालेल्या या प्रकरणानंतर गेले दोन दिवस हे सर्वजण शहरात दिवसभर मोकळेच फिरत होते.
आज सकाळी जगताप व काळे यांच्यासमवेत राष्ट्रवादीचे सगळे हजर झाले. सहायक पोलीस निरीक्षक विजय देशमुख यांनी त्यांना पोलीस ठाण्यातच अटक केली व नंतर लगेचच न्यायालयात नेले. आरोपींच्या वतीने महेश तवले व अन्य वकिलांनी बाजू मांडली. देशमुख यांनी तपासी अधिकारी म्हणून बाजू मांडली. न्यायालयीन कोठडी मिळाल्यावर लगेचच आरोपीच्या वकिलांनी जामीनाचा अर्ज केला. प्रत्येकी १५ हजार रूपयांच्या वैयक्तीक जातमुचलक्यावर त्यांची सुटका झाली.
दरम्यान राष्ट्रवादीच्या आरोपींप्रमाणेच मनसेच्या आरोपींनीही पोलिसांना स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर होण्याची शब्द दिला होता अशी माहिती समजली. मात्र आज दिवसभरात तरी मनसेचे कोणीही हजर झालेले नव्हते. उलट वसंत लोढा, संजय झिंजे व मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी पोलीस उपअधीक्षक (शहर) शाम घुगे यांची भेट घेऊन मनसेच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा खोटा असून तो काढून घ्यावा अशी मागणी केलेली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Mar 2013 रोजी प्रकाशित
जगताप, काळेंसह ५ जणांना अटक व सुटका
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गाडीच्या ताफ्यावरील दगडफेक प्रकरणात आरोपी असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संग्राम जगताप, युवक राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष किरण काळे व अन्य ५ जण आज भिंगार पोलीस ठाण्यात हजर झाले.

First published on: 02-03-2013 at 03:49 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arrest and release of jagtap kale with other five