गुरूनानक उच्च माध्यमिक शाळेचे शिक्षक आणि मराठी विज्ञान परिषद नागपूर विभागाचे सचिव अशोक भड यांना प्राप्त झालेल्या आदर्श शिक्षक पुरस्कारावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले आहे. यासंदर्भात न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली असून, न्यायालयाने सोनेगाव पोलिसांना चौकशीचे आदेश दिले.
भड यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे हा पुरस्कार मिळवून शासनाची फसवणूक केली आहे, असा आरोप याचिकाकर्त्यांने केला आहे. याचिकेवरील सुनावणीअंती प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी आनंद बोरकर यांच्या न्यायालयाने सोनेगाव पोलिसांना चौकशी करून एक महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
नागपूर जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडून आरोपाशी संबंधित माहिती प्राप्त करण्यात यावी, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे. अशोक भड हे बेझनबाग येथील गुरूनानक उच्च माध्यमिक शाळेत शिक्षक आहेत. त्यांना २००३ मध्ये आदर्श शिक्षकाचा पुरस्कार प्राप्त झाला. या पुरस्कारावर आक्षेप घेणारी याचिका हेमंत दारव्हेकर यांनी दाखल केली. दारव्हेकर हे शंकरराव धवड पॉलिटेक्निकच्या इलेक्ट्रॉनिक व टेलिकॉम्युनिकेशन विभागात प्रमुख होते. त्यांना बडतर्फ करण्यात आले होते.
आदर्श शिक्षक पुरस्कार हा प्राथमिक आणि माध्यमिक प्रवर्गातील शिक्षकांना प्रदान केला जातो. भड हे उच्च माध्यमिक प्रवर्गातील शिक्षक आहेत. ते अकरावी आणि बारावीचे जीवशास्त्राचे शिक्षक आहेत, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.
भड यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर दोन वेतवाढ देण्यात आली. त्यानुसार त्यांना वार्षिक ६० हजार रुपये मिळाले. आतापर्यंत त्यांना सहा ते सात लाख रुपये मिळाले. या पुरस्कारासाठी पात्र उमेदवारांचा प्रस्ताव संबंधित शाळेचे प्राचार्य, मुख्याध्यापक किंवा व्यवस्थापनाचे सचिव यांच्याकडून जाणे आवश्यक आहे. या प्रक्रियेचेदेखील पालन झाले नाही. त्यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे हा पुरस्कार मिळवला असून सात लाखांनी फसवणूक केली आहे. त्यांच्याविरुद्ध भादंविच्या १२०(ब), ४२०, ४६६, ४६७, ४६८, ४७१ या कलमांर्तगत खटला चालविण्यात यावा, अशी प्रार्थना दारव्हेकर यांनी केली आहे.