जोगेश्वरी (पूर्व) येथील ‘अस्मिता’ या शैक्षणकि संस्थेच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या शिक्षकांनी सोहळ्यासाठी पंचपक्वान्नांचे ताट दूर सारत राज्यातील दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांसाठी उत्स्फूर्तपणे ३७ हजार रुपयांची आर्थिक मदत उभी केली. संस्थेचा ३७ वा वर्धापनदिन शिक्षकांनी सामाजिक बांधिलकी जपत साजरा केला.
दरवर्षीप्रमाणे १ मे या वर्धापनदिनाला एकत्र जमलेल्या संस्थेच्या सभासदांना उपाध्यक्ष दादा पटवर्धन यांनी वर्तमान सामाजिक परिस्थिती लक्षात घेता गोडाधोडाच्या जेवणाऐवजी जेवण घ्यावे आणि त्यातून उरलेले पैसे दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना मदत करणाऱ्या पुण्यातील ‘आपणच’ संस्थेला द्यावे, असे आवाहन केले.
 या आवाहनाला शिक्षकांसह उपस्थित सर्वानीच उत्स्फूर्त प्रतिसाद देत ३७ हजार रुपये गोळा केले. हा निधी संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब वानखेडे आणि कार्याध्यक्ष जगदीश सामंत यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. वर्धापनदिनाच्या निमित्ताने ‘शारीरिक स्वच्छता, हायजिनिक फूड’ या विषयावर डॉ. गिरीश महाजन यांचे मार्गदर्शन तर इस्कॉन मंदिराचे सिधीर गौरांगदास स्वामी यांनी ‘ताण व्यवस्थापन’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.
त्याचबरोबर सुहास कबरे यांच्या वाद्यवृंदातर्फे ‘होऊ कसे उतराई’ हा कार्यक्रम सादर करण्यात आला. ‘अस्मिता’च्या स्थापनेपासून कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.