नगर तालुक्यातील क्षारयुक्त पाणी असलेल्या गावांचे टँकर प्रशासनाने बंद केल्याने ते पुन्हा सुरू करावेत अशी मागणी करत शिवसेनेचे कार्यकर्ते व ग्रामस्थ महिलांनी आज पालकमंत्री मधुकर पिचड यांना घेराव घातला. पिचड दुपारी जिल्हा परिषदेतील कार्यक्रमासाठी आले होते. प्रवेशद्वारातच त्यांना घेराव घालण्यात आला.
पिचड यांनीही आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद देत, बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना बाजूला सारत आंदोलकांशी संवाद साधला. पिचड यांनी तातडीने जिल्हाधिका-यांना बोलावून घेऊन बंद केलेले टँकर सुरू करण्याचे आदेश दिले. विभागीय आयुक्त रवींद्र जाधव या वेळी उपस्थित होते. पंचायत समिती सदस्य संदेश कार्ले यांनी आंदोलकांचे नेतृत्व केले.
नगर तालुक्यातील सीना नदीकाठच्या गावांमध्ये नदीच्या दूषित पाण्यामुळे क्षारयुक्त पाणी आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर दि. २२ जुलैस या गावांना पाणीपुरवठा करणारे टँकर प्रशासनाने बंद केले. त्यामुळे ग्रामस्थांनी लगेच दुस-या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. जिल्हाधिकाऱ्यांनी टँकर सुरू करण्याचे आदेश दिले. परंतु आठवडय़ानंतर पुन्हा, ३१ जुलैस प्रशासनाने बंद केले.
आज प्रथम जि. प. अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांनीही आंदोलकांनी चर्चा केली मात्र पिचड यांनाच निवेदन देण्याचा त्यांचा आग्रह होता. पिचड व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार आंदोलकांना सामोरे गेले व पालकमंत्र्यांनी टँकर सुरू करण्याचे आश्वासन दिल्याची ग्वाही दिली. जि. प. सदस्य शारदा भिंगारदिवे, रामदास भोर, पोपट निमसे, बापू कुलट, अश्विनी जाधव, अविनाश पवार आदी आंदोलनात सहभागी झाले होते.