लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी,
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी,
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी,
एवढय़ा जगात माय मानतो मराठी..  
या मराठी अभिमान गीतगायनाने वाशी येथील मराठी साहित्य मंदिर व कला मंडळाचे सभागृह भारावून गेले होते. नििंमत्त होते जागतिक मराठी दिनाचे. या समूह गीताचे संगीतकार कौशल इनामदार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला मराठी रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा.. या महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. संगीतकाराची खरी ओळख त्याच्या गाण्यामध्ये असते. ही गाणी रेडिओवर ऐकली तरच लक्षात राहतील.
मात्र मराठी गाणी डाऊन मार्केट म्हणून लावली जात नव्हती. यामुळेच अवस्था वाढली आणि त्याच वेळी जगातील भव्य असे गीत मी तयार करीन व ते गीत मराठीच असेल असा निर्णय घेतल्याचे कौशल याने सांगितले. त्यांनतर ९ ध्वनिमुद्रक, ६५ वादक, ११२ प्रस्थापित गायक ३५६ समूह गायक आणि मराठी भाषेवर मनापासून प्रेम करणाऱ्या २००० लोकांच्या सहकार्याने मराठी अभिमान गीत सकारल्याचे त्यांनी सांगताना अनेक आठवणींना त्यांनी उजाळा दिला.
या गाण्यामुळे अनेक लोक एकत्र आल्याचे त्यांनी सांगितले. यापुढील टप्पामध्ये मराठी अस्मिता हे संकेतस्थळ तयार करण्यात आल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.