केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जय भवानी क्रीडा मंडळ आयोजित महापौर चषक क्रिकेट स्पर्धेत अटीतटीच्या अंतिम सामन्यात औरंगाबादच्या यंग इलेव्हन संघाने जालन्याच्या काणे क्रिकेट क्लबवर १९ धावांनी रोमहर्षक विजय मिळवत महापौर चषक व रोख ७२ हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले. उपविजेतेपद मिळविणाऱ्या जालन्याच्या काणे संघास रोख ५१ हजार रुपये व महापौर चषक देऊन सन्मानित करण्यात आले.
स्पर्धेतील मालिकावीराचा बहुमान औरंगाबाद यंग इलेव्हनचा कर्णदार संदीप लहाने याने स्पर्धेत अष्टपैलू खेळी करून मिळविला. त्यास रोख २१ हजार रुपये व चषक देण्यात आला. स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज म्हणून औरंगाबादचा स्वप्नील खडसे, तर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून जालन्याचा बालाजी खलसे यास प्रत्येकी रोख पाच हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले. अंतिम सामन्यातील सामनावीराचा मानकरी औरंगाबादचा भेदक गोलंदाज अजय गवई ठरला.
विजेत्यांना जिल्हाधिकारी डॉ. शालिग्राम वानखेडे, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप डोईफोडे, उपमहापौर सज्जुलाला, माजी आमदार हरिभाऊ लहाने यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. सभापती विजय जामकर, सचिन देशमुख, दिलीप ठाकूर, व्यंकट डहाळे, सचिन अंबिलवादे, भीमराव वायचळ, विजय धरणे, पाशाभाई, रामा कानडे, प्रमोद वाकोडकर, खाजाभाई, मेहराजभाई, राजू शिंदे यांनी उपस्थित होते. गुणलेखक म्हणून अरिवद देशपांडे यांनी काम पाहिले. सामन्याचे धावते समालोचन नितीन कारखानीस यांनी केले.