सध्या संसर्गजन्य ‘स्वाईन फ्लू’ने सर्वत्र धुमाकूळ घातला असून आतापर्यत नागपुरातील विविध रुग्णालयात २४ नागरिकांचे बळी गेले आहेत. सध्याचे वातावरण हे स्वाईन फ्लूचा प्रसार आणि प्रचार होण्यास सहाय्यभूत ठरत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये स्वाईन फ्लूबाबत जागृती व्हावी, यासाठी जिल्ह्य़ातील प्रत्येक गावात प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या प्रभातफेऱ्या काढण्यात येत आहे. तसेच प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांनाही प्रशिक्षण दिले जात आहे. ग्रामीण भागातील आशा कार्यकर्तीना प्रशिक्षण देण्यात आले आहे.  
‘स्वाईन फ्लू’मुळे मृत्युमूखी पडणाऱ्यांची व बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी आरोग्य विभागातर्फे विशेष उपक्रम राबवण्यात येत आहे. त्यानुसार आशा कार्यकर्तीना प्रशिक्षण देण्यात आले असून ग्रामीण भागातील शिक्षकांनाही प्रशिक्षण दिल्या जात आहे. स्वासोच्छवास आणि खोकल्यामुळे या आजाराचा प्रसार होत असल्याने अशी लक्षणे दिसून येणाऱ्या मुलांना शाळेत येण्यापासून परावृत्त करावे. अशा मुलांचा शोध घेऊन त्याची माह्तिी प्राथमिक आरोग्य केंद्र व आरोग्य उपकेंद्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांना द्यावी, अशा सूचना या प्रशिक्षणात दिल्या जात आहे. त्याचप्रमाणे आरोग्य विभाग आणि शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने काही संस्थांची मदत घेऊन प्रत्येक गावांमध्ये प्रभातफेऱ्या काढण्यात येत आहे.
प्रशिक्षित आशा कार्यकर्त्यां गावातील संशयित स्वाईन फ्लू रुगांचा शोध घेऊन त्याची माहिती आरोग्य खात्याचे कर्मचारी व अधिकाऱ्यांना देत आहेत.
नवीन वर्षांची सुरुवात होताच स्वाईन फ्ल्यूचे रुग्ण मोठय़ा संख्येने दिसून येऊ लागले. १२ फेब्रुवारीपर्यंत शहरातील विविध रुग्णालयात स्वाईन फ्ल्यूने २४ नागरिकांचा बळी गेला आहे. तर एकूण १०० नागरिकांना स्वाईन फ्ल्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. स्वाईन फ्लूमुळे गेल्या दहा दिवसांपासून दररोज एकाचा मृत्यू होत आहेत तर सरासरी चार ते पाच बाधित रुग्ण आढळून येत आहे. त्यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाला असून नागरिकांनी स्वत:हून काळजी घ्यावी, असे आवाहन केले जात आहे. स्वाईन फ्ल्यूची संख्या वाढत असल्याचे लक्षात येताच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) स्वाईन फ्लू वॉर्डात आणखी १५ खाटा वाढवण्यात आल्या आहेत.
एकूण खाटांची संख्या आता ४५ एवढी झाली आहे. रुग्णांची संख्या वाढत राहिली तर त्यात आणखी १५ खाटा वाढवण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाने जाहीर केले आहे. तसेच येथील व्हेंटिलेटर्स वाढवण्यात येणार आहे. सध्या मेडिकलमध्ये १९ रुग्ण दाखल असून त्यामध्ये १६ रुग्ण ‘पॉझिटिव्ह’ आहेत. यातील एका रुग्णाची प्रकृती चिंताजनक आहे. तर तिघांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असल्याची माहिती मेडिकलच्या सूत्रांनी दिली. खोकला येणे, शिंक येणे, ताप येणे ही स्वाईन फ्लू आजाराची लक्षणे आहेत. ही लक्षणे दिसताच ताबडतोब रुग्णालयात जाऊन तपासणी करणे आवश्यक आहे.
स्वाईन फ्लूबाधित रुग्णांवर तातडीने औषधोपचार व्हावे, यासाठी मेडिकलमध्ये ४५ खाटांचा एक स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात आला आहे. येथे येणाऱ्या रुग्णांवर योग्य उपचार केले जात आहेत.
वॉर्डात चार व्हेंटिलेटर्स असून औषधीचा साठाही उपलब्ध आहे. शिंका किंवा खोकला येत असल्याने रुमाल तोंडावर धरून ठेवावा. गर्दीत काळजी घ्यावी. लक्षणे दिसताच ताबडतोब जवळच्या रुग्णालयात जावे. तेथे जाणे शक्य नसल्यास मेडिकलमध्ये यावे, असा सल्ला मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक  डॉ. जे.बी. हेडाऊ यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिला.