आयुर्वेदात रोगाचा समूळ नाश करण्याची शक्ती असल्याने आयुर्वेदाचा सर्वानी स्वीकार करावा. गुरुजनांनी दिलेले ज्ञान देऊन वैद्य घडवावा, असे आवाहन सुप्रसिद्ध चिकित्सक आयुर्वेदतज्ज्ञ वैद्य समीर जमदाग्नी यांनी केले.
बैद्यनाथ आयुर्वेद भवनच्यावतीने धन्वंतरी जयंतीनिमित्त भवनच्या प्रांगणात आयोजित समारंभात ते बोलत होते. यावेळी भवनचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक सुरेश शर्मा यांच्या हस्त वैद्य समीर जमदाग्नी व वैद्य जयंत फडके यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. बैद्यनाथच्या सर्वच कारखान्यांचे आधुनिकीकरण करण्यात आले असून गरजेनुसार नवीन उपकरणे लावण्यावर भर दिला जात आहे. यामुळे गुणवत्ता व उत्पादकतेत वाढ झाल्याचे सुरेश शर्मा यांनी सांगितले. बैद्यनाथतर्फे सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी दिली.
आयुर्वेदाने असाध्य रोग बरे झाले आहेत. ही एक प्रभावी उपचार पद्धती असून तिचा प्रसार व प्रचार होण्याची गरज वैद्य जयंत फडके यांनी व्यक्त केली. वैद्य टेकचंदानी, रामकृष्ण छांगानी, हर्षला शर्मा, हर्षद पटेल यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन वैद्य रमेश शर्मा यांनी तर आभार महाव्यवस्थापक श्रीखंडे यांनी मानले.