ज्या भूमीत बालगंधर्वानी आपल्या अभिनयाचे पहिले पाऊल टाकत रंगभूमीवर पदार्पण केले त्याच्या स्मतिप्रित्यर्थ सांगली महापालिकेने मिरजेत बालगंधर्व नाटय़गृह उभारले, पण गेली ६ वष्रे हे नाटय़गृह बालगंधर्वाच्या पुतळय़ाच्या प्रतिक्षेत आहे.
सांगली, मिरज आणि कूपवाड शहराची महापालिका होताच सांस्कृतिक चळवळीतून मिरजेतील बालगंधर्व नाटय़गृहाचे नूतनीकरण करण्याची मागणी झाली. त्यातून नाटय़गृहाचे केवळ नूतनीकरण न करता पुनर्बाधणी करण्याचा प्रस्ताव महापालिकेने हाती घेतला. त्यानुसार ६ कोटी ५० लाख रुपये खर्च करून नवीन नाटय़गृहाची उभारणी करण्यात आली. या ठिकाणी अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. केवळ सांस्कृतिक कार्यक्रम करणे एवढाच उद्देश न ठेवता सांस्कृतिक चळवळीला प्राधान्य मिळावे, नाटय़ चळवळ वाढावी, अभिनयाचे प्रशिक्षण मिळावे अशी रचना या ठिकाणी करण्यात आली आहे. संपूर्ण नाटय़गृह वातानुकूलित यंत्रणेने सज्ज असले तरी वीजबिलामुळे सध्या या यंत्रणेचा वापर खचीतच होतो.
नाटय़गृहाच्या दर्शनी भागात बालगंधर्वाचा पुतळा बसविण्यासाठी चबुतरा तयार करण्यात आला आहे. मात्र या ठिकाणी पुतळा न बसविता ६ इंच बाय ८ इंच चित्रप्रतिमा बसविण्यात आली आहे. उद्घाटनाचा कार्यक्रम २००५ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी घाईगडबडीत कार्यक्रम झाला म्हणून पुतळा नंतर बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र अद्याप पुतळा बसविण्यासाठी महापालिकेला कृती करावीशी वाटलेली नाही.
हंसप्रभा थिएटर या नावाने तत्कालीन संस्थानिक पटवर्धन यांनी या नाटय़गृहाची उभारणी केली होती. ऑक्टोबर १९०५ मध्ये बालगंधर्व तथा नारायण श्रीपाद राजहंस या रंगकर्मीचा शोध मराठी नाटय़चळवळीला याच रंगमंदिरात लाभला. बालगंधर्वानी यावेळी संगीत शारदा या नाटकातील नटीची भूमिका साकारली होती. याच रंगभूमीवर बालगंधर्वाच्या अभिनयाने नटलेले गुप्तमंजूषा या नाटकाचा प्रयोग पाहण्यासाठी लोकमान्य टिळक, राजश्री शाहू महाराज यांची उपस्थितीही लाभली होती.
अशा या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या रंगभूमीचा वापर सांस्कृतिक चळवळीसाठी व्हावा. याकरिता नाटय़रसीकांनी आंदोलन उभे केले होते. या आंदोलनाचे नेतृत्व ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त वि. स. खांडेकर यांनी केले होते. या आंदोलनाची दखल घेत १९५२ मध्ये तत्कालीन मिरज नगरपालिकेने नाटय़गृह ताब्यात घेतले. माधवराव पटवर्धन यांच्याकडून ताबा घेतल्यानंतर हंसप्रभा स्टुडिओचे बालगंधर्व नाटय़मंदिर असे नामकरण करण्यात आले. १९८९ मध्ये या ठिकाणी बालगंधर्वाचा अर्धपुतळाही बसविण्यात आला होता. मात्र नूतनीकरण करीत असताना हा पुतळा नगरपालिकेने हलविला असून तो सध्या महापालिकेच्या ताब्यात आहे. या ठिकाणी कोटय़वधी रुपये खर्च करणाऱ्या महापालिकेला बालगंधर्वाचा पुतळा बसविण्यासाठी आíथक तरतूद करता येणार नाही अशी परिस्थिती मुळीच नाही. मात्र इच्छाशक्तीचा अभाव हाच यामागे असावा अशी शंका नाटय़रसिक व्यक्त करीत आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 29th Jan 2014 रोजी प्रकाशित
मिरजेतील नाटय़गृह अद्याप बालगंधर्वाच्या पुतळय़ाच्या प्रतीक्षेत
ज्या भूमीत बालगंधर्वानी आपल्या अभिनयाचे पहिले पाऊल टाकत रंगभूमीवर पदार्पण केले त्याच्या स्मतिप्रित्यर्थ सांगली महापालिकेने मिरजेत बालगंधर्व नाटय़गृह उभारले, पण गेली ६ वष्रे हे नाटय़गृह बालगंधर्वाच्या पुतळय़ाच्या प्रतिक्षेत आहे.
First published on: 29-01-2014 at 03:25 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Balagandharva theatre still waiting for the statue in miraj