बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये एका बोगस खात्यामध्ये ग्राहकांचा धनादेश वटवून बँकेची ९६ लाख रुपयांनी फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी जरीपटका पोलिसांनी बँकेचा तत्कालीन लिपिक देवानंद गालोमल निचवानी, पत्नी अनिता, भाऊ मनोज व किशोर निचवानी, निर्मल रंगारी, महेश कुंगवानी, गोविंद गणवीर, संजय वानखेडे, कविता सावलानी, वीणा निचवानी आणि भारती इंड्रस्टीजचा संचालक यांच्यावर गुन्हा दाखल केला. मनोज निचवानी यांचे जरीपटका भागात ज्वेलर्सचे दुकान आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार देवानंद हा जरीपटका शाखेत लिपिक होता. त्याने नातेवाईकांच्या नावाने बँकेत खाते उघडले होते. ग्राहकांचे धनादेश तो नातेवाईकांच्या खात्यात वटवित होता. तसेच नातेवाईकांच्या नावे असलेला एकच धनादेश दोन ते तीन खात्यामध्ये वटविण्याचा प्रताप त्याने केला. हा सर्व अपहार त्याने ६ नोव्हेंबर २००७ ते ३१ मे २००८ या दरम्यान केला. त्यानंतर लगेच देवानंदने स्वेच्छानिवृत्ती घेतली. बँकेच्या ऑडिट दरम्यान मनोजच्या खात्यात सर्वाधिक व्यवहार झाल्याचे उघडकीस आले. तसेच एकच धनादेश तीन जणांच्या खात्यात जमा झाल्याचेही समोर आले आहे. देवानंदने तब्बल ४६ धनादेश वटविले. यासंदर्भात व्यवस्थापक दीपक रंगारी यांनी जरीपटका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. ठाणेदार हनपुटे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संपूर्ण दस्ताऐवजाची दोन दिवस तपासणी केल्यानंतर देवानंद निचवानीसह १३ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.  देवानंद निचवानीने भारती इंड्रस्टीज नावाची कंपनी स्थापन केली. यात मागासवर्गीय लोकांना संचालक बनविले. त्यानंतर त्याने कंपनीला मिळणाऱ्या शासकीय सवलतीचा लाभ घेतला. कंपनीच्या नावे धनादेश टाकून तो कंपनीसह नातेवाईकांच्या खात्यातही वटविला. गुन्हा दाखल झाल्याचे कळताच अनेकजण भूमिगत झाल्याची माहिती आहे. आरोपींच्या अटकेसाठी विशेष पथक स्थापन करण्यात आले.