लातूर जिल्ह्य़ात शेतीसाठी घेतलेल्या कर्जाची थकबाकी असणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावाची यादी बँकेसमोर डिजिटल बोर्डावर लावून शेतकऱ्यांची अब्रू चव्हाटय़ावर आणणाऱ्या भारतीय स्टेट बँक व लिड बँकेने येत्या दोन दिवसांत यादी काढून घ्यावी अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मराठवाडा अध्यक्ष सत्तार पटेल यांनी दिला.
लातूर जिल्ह्य़ात सध्या गंभीर दुष्काळी स्थिती आहे. शेतकऱ्यांनी शेतीची मशागत करण्यासाठी बँकेकडून कर्ज घेतले आहे. हे शेतकरी मागील अनेक वर्षांपासून बँकेचे नियमित कर्जदार आहेत. व्याजासह ही रक्कम ते बँकेकडे परत करतात. मात्र, निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे.
विहिरीसाठी कर्ज घेतले, परंतु विहिरीचे पाणी आटले आहे. ठिबक सिंचनाचा आटोकाट प्रयत्न करूनही उसाचे उत्पादन २५ टक्क्य़ांच्या खाली आले आहे. मागील पाच-सहा वर्षांपासून निसर्गाचे दुष्टचक्र चालू असल्याने शेतकरी बँकेचे हप्ते भरू शकत नाहीत. एका बाजूला सरकारचे चुकीचे धोरण, तर दुसऱ्या बाजूस बँक अधिकाऱ्यांचे मुजोर धोरण आहे. या सर्व बाबींना वैतागून शेतकरी आत्महत्येचा पर्याय स्वीकारतात. यास प्रशासन व बँक प्रशासन जबाबदार आहे, असे सत्तार पटेल यांनी म्हटले आहे.
शेतकऱ्यांनी कर्ज घेताना कोटय़वधींच्या जमिनी बँकेकडे गहाणखत करून दिल्या. या कर्जाला व्याजदर चालू आहे. शेती पिकल्यास शेतकरी बँकेची पूर्ण रक्कम भरण्यास तयार आहेत. शेतीशिवाय इतर उद्योगधंद्यांनाही कोटय़वधींची कर्जे बँकांनी दिली आहेत. त्यांची मोठी थकबाकी आहे.
ही रक्कम वसूल होण्याची सुतराम शक्यता नाही. त्या उद्योगाची यादी प्रसिद्ध केली आहे काय, असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला. यासंबंधी लिड बँकेच्या व्यवस्थापकांना निवेदन दिले. निवेदनावर जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोरे, विधी आघाडीचे प्रांताध्यक्ष अ‍ॅड. विजयकुमार जाधव, जिल्हा उपाध्यक्ष अरुण कुलकर्णी आदींच्या सह्य़ा आहेत.