नाटय़संमेलनाच्या कालावधीत राज्यामध्ये कोठेही प्रयोग न करण्यासंदर्भात नाटय़निर्माता संघाने ठराव संमत केल्यामुळे आता बारामती येथील आगामी नाटय़संमेलनामध्ये रंगकर्मीची मांदियाळी पाहण्यास मिळेल, अशी अपेक्षा नाटय़रसिकांकडून व्यक्त केली जात आहे. प्रयोगापेक्षा संमेलनाला महत्त्व दिल्यामुळे बहुतांश रंगकर्मी नाटय़संमेलनामध्ये सहभागी होतील, अशी चिन्हे आहेत.
नाटय़संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याचा अपवाद वगळता अन्य दिवशी नाटय़ परिषदेच्या पदाधिकाऱ्यांव्यतिरिक्त रंगकर्मीचा अभाव हेच चित्र दरवर्षी नाटय़संमेलनातून पाहावयास मिळते. हे चित्र बारामती येथे २२ ते २४ डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या नाटय़संमेलनात दिसणार नाही, अशी शक्यता आहे. संमेलनाच्या काळात राज्यभरातील नाटय़निर्मात्यांनी कोठेही प्रयोग लावणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. नाटय़निर्माता संघाचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचा वाढदिवस आणि १२-१२-१२ या शतकातून एकदाच येणाऱ्या तारखेचा योग साधून यंदा बारामती येथे नाटय़संमेलन होत आहे. शरद पवार हे नाटय़ परिषदेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष असून राष्ट्रवादीचे खजिनदार हेमंत टकले हे नाटय़ परिषदेचे अध्यक्ष आहेत. या संमेलनानंतर नाटय़ परिषदेच्या नव्याने निवडणुका होणार असल्याने हेमंत टकले यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या संमेलनास अधिकाधिक रंगकर्मी उपस्थित राहावेत, असे प्रयत्न सुरू केले आहेत.
नाटय़संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याला कलाकार मोठय़ा संख्येने उपस्थित असतात. मात्र, त्यानंतरच्या परिसंवादातील कलाकार किंवा संमेलनात होणाऱ्या नाटय़प्रयोगातील कलाकार वगळता बहुतांश कलाकार हे संमेलनात थांबण्याऐवजी त्यांच्या प्रयोगाच्या तारखांची उपस्थिती महत्त्वाची मानतात. नाटय़ परिषदेच्या कार्यकारिणीवरील कलाकार आणि संमेलनाच्या संयोजन समितीतील कलाकार यांच्याखेरीज अन्य रंगकर्मी नाटय़संमेलनामध्ये पूर्ण वेळ हजेरी लावत नाहीत ही नाटय़प्रेमींची तक्रार असते. त्यावर तोडगा काढण्यामध्ये नाटय़निर्माता संघाला यश आले असून यंदा बारामतीला संमेलन असल्यामुळे तरी उत्तम बडदास्त होईल या अपेक्षेसह रंगकर्मींचे दर्शन होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.