काही बोटावर मोजण्याइतके नगरसेवक वगळता नवी मुंबईतील काँग्रेसने राष्ट्रवादीला ठेंगा दाखविल्याचे चित्र असून काही नगरसेवक तर अपक्षांचा प्रचार करण्यात गुंतले असल्याचे दिसून येत आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत घडय़ाळाला मतदान करा, असा प्रचार केल्यानंतर पालिका निवडणुकीत केवळ हातावर शिक्का मारण्याचा आग्रह मतदारांकडे करावा लागत असल्याची तक्रार एका काँग्रेस नगरसेवकाने केली.
चार पालिका निवडणुकीत नवी मुंबईत काँग्रेस व राष्ट्रवादी एकमेकांच्या विरोधात लढलेले आहेत. नवी मुंबईत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांचे पक्के वैरी आहेत. त्यामुळे लोकसभा, विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मदत करताना काँग्रेसचे स्थानिक नेते सहजासहजी तयार होत नाहीत. यात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलेल्या अन्यायाचा पाढा जास्त वाचला जातो.
या लोकसभा निवडणुकीत आघाडीचे उमेदवार संजीव नाईक यांना मदत करण्यासाठी काँग्रेसचे प्रांताध्यक्ष माणिकराव ठाकरे व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्थानिक नेत्यांच्या नाकदुऱ्या काढण्याचा प्रयत्न केला. या नेत्यांच्या समोर मान डोलवणाऱ्या नेत्यांनी मात्र नंतर राष्ट्रवादीला मदत करण्यासाठी आपला हात आखडता घेतला आहे.
संजीव नाईक यांनी आपल्या जाहीरनाम्यात काँग्रेसचे सरचिटणीस व सिडको संचालक नामदेव भगत, काँग्रेसचे अध्यक्ष दशरथ भगत व त्यांचे राजकीय गुरू आणि माजी महापौर अनिल कौशिक यांच्या छबी प्रसिद्ध करून नवी मुंबई काँग्रेस आपल्याबरोबर असल्याचे चित्र निर्माण केले आहे. यात माजी महापौर रमाकांत म्हात्रे व नेरुळचे नगरसेवक संतोष शेट्टी यांना चार हात लांब ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या दोघांचा विरोध राष्ट्रवादीने गृहीत धरला आहे.
छबी छापण्यात आलेल्यांपैकी कोण किती मदत करीत आहे याचा लेखाजोखा मांडण्याचे काम राष्ट्रवादी करीत आहे. यात नेरुळवरून नाईक यांच्या लढाईला लागणारी कुमक पाठविण्यात आल्याचे समजते. नवी मुंबई काँग्रेसमध्ये नेते जास्त आणि कार्यकर्ते कमी असल्याने राष्ट्रवादीने आपली यंत्रणा वापरली असून नऊ नगरसेवकांना आपल्या प्रचारासाठी मैदानात उतरवले आहे. यात माजी नगरसेविका संगीता सुतार ह्य़ा नाईक यांच्या प्रचारात हिरिरीने फिरत होत्या. याशिवाय काही ब्लॉक अध्यक्ष आणि प्रभाग अध्यक्षांनी स्थानिक नेतृत्वाला न जुमानता नाईक यांना मदत करण्याचे ठरविले आहे.