सोलापूर शहर आजही मागासलेले असून येथील गोरगरिबांना जागतिक दर्जाच्या शिक्षणाची कास धरता यावी म्हणून आपण पुढाकार घेऊन सोलापूर विद्यापीठाची निर्मिती केली. शिक्षणाची भूक ठेवून दिवंगत भाऊसाहेब गांधी यांनी वालचंद शिक्षण समूहाच्या वाटचालीत मोठे योगदान दिले. त्यामुळे या शिक्षण संस्थेला शिक्षणाचे पावित्र्य जपता आले, असे गौरवोद्गार केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी काढले.
केंद्र शासनाने जैन धर्माला अल्पसंख्याक दर्जा दिल्याबद्दल तसेच याकामी शिंदे यांनी महत्त्वाचे योगदान दिल्याबद्दल वालचंद शिक्षण समूह व महाराष्ट्र जैन अल्पसंख्याक कृती समितीच्या वतीने रविवारी त्यांचा कृतज्ञतापर सत्कार सोहळा आयोजिला होता. त्या वेळी शिंदे हे बोलत होते. वालचंद शिक्षण समूहाचे मानद सचिव डॉ. रणजित गांधी यांनी शिंदे यांचा सत्कार केला. या वेळी व्यासपीठावर आमदार प्रणिती शिंदे व आमदार दिलीप माने यांच्यासह माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, प्रदेश काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष चंद्रकांत दायमा, काँग्रेसचे शहराध्यक्ष धर्मा भोसले, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, अश्विनी सहकारी रुग्णालयाचे अध्यक्ष बिपीनभाई पटेल आदींची उपस्थिती होती.
भाऊसाहेब गांधी यांच्या आठवणींना उजाळा देताना शिंदे म्हणाले, एका समृद्ध घराण्यातून आलेल्या गांधी यांना खासगी आयुष्यात काहीही कमी नव्हते. तरीही त्यांनी सामाजिक बांधिलकी व शिक्षणाच्या प्रेमापोटी तब्बल नऊ वर्षे सर्वोच्च न्यायालयात हेलपाटे घालून समाजाच्या हितासाठी वालचंद शिक्षण समूहाला अल्पसंख्याक दर्जा प्राप्त करून दिला. एखाद्या नेतृत्वाकडे भविष्याचा वेध घेण्याची क्षमता असणे महत्त्वाचे ठरते. ते भाऊसाहेबांच्या कार्यातून दिसून येते. तोच वारसा डॉ. रणजित गांधी हे चालवत आहेत. ही बाब सोलापूरसाठी भूषणावह असल्याचे उद्गार त्यांनी काढले.
आदर्श गृहनिर्माण संस्थेच्या प्रकरणात आपणास क्लीन चिट मिळाल्याचा पुनरुच्चार करीत शिंदे यांनी इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांशी बोलताना अधिक जागरूक राहावे लागत असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी नोंदविली. जैन साधुसंतांवर होणाऱ्या हल्ल्याची दखल घेत शिंदे यांनी त्यांच्या कायमस्वरूपी सुरक्षिततेबाबत सूचना देण्याचे आश्वासन दिले.
महाराष्ट्र जैन अल्पसंख्याक कृती समितीचे अध्यक्ष पद्म रांका यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा. ज्योती वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले. तर प्राचार्य डॉ. शशिकांत हलकुडे यांनी आभार मानले.