पुणे जिल्ह्य़ात झालेल्या जोरदार पावसाने भीमा व घोड नदीस पूर आला असून, कर्जत व श्रीगोंदे तालुक्यांतील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. तालुक्यातील सिद्धटेक येथे तर भव्य अशा पुलास पाणी टेकले आहे.
पुणे जिल्ह्य़ात मागील काही दिवसांत जोरदार पाऊस झाला. सध्या जोर ओसरला असला तरी धरणे भरल्यामुळे नदीद्वारे पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे कर्जत व श्रीगोंदे तालुक्यांतील नदीकाठच्या गावांना धोका निर्माण झाला आहे. श्रीगोंदे तालुक्यातील आर्वी गावाला पाण्याने वेढले आहे. या गावाचा अन्य गावांशी संपर्क तुटला आहे. कर्जत तालुक्यातील अष्टविनायकाचे तीर्थक्षेत्र असलेले सिद्धटेक येथे नगर व पुणे जिल्ह्य़ास जोडणा-या पुलास पाणी टेकले आहे. या पाण्यामुळे भांबोरा, भाबुळगाव, शिंपोरा, दुधोडी या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
प्रांताधिकारी संदीप कोकडे यांनी सांगितले की, प्रशासन सज्ज असून नदीकाठच्या नागरिकांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. कर्जत व श्रीगोंद्याच्या तहसिलदारांना सूचना देण्यात आल्या असून मंडल निरीक्षक व कामगार तलाठीही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. पुणे जिल्हयात दोन दिवसांत पाऊस उघडला असून त्यामुळे धोका कमी झाला आहे.