भिंगार विकासाच्या प्रश्नावर महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीसाठी शिष्टमंडळ अडीच तास ताटकळले, मात्र प्रत्यक्षात त्यांच्या पदरी कोणतेही ठोस अश्वासन पडले नाही. मंत्र्यांना इतर कार्यक्रमाला जाण्याची घाई असल्याने बैठक मात्र केवळ पंधरा ते वीस मिनिटांतच आटोपली. भिंगारचे अनेक प्रश्न लष्करी प्रशासनाशी संबंधित आहेत, मात्र लष्कराचे प्रतिनिधी व जिल्हाधिकारीही बैठकीस उपस्थित नसल्याने प्रश्न अनुत्तरीतच राहिले. पुन्हा बैठक घेऊ असे सांगत मंत्र्यांनी पक्ष्याच्याच शिष्टमंडळाची बोळवण केली.
भिंगार विकासाचे प्रश्न अनेक वर्षांपासुन रेंगाळलेलेच आहेत. छावणी मंडळाच्या निवडणुकीचे वेध लागल्यानंतर, पक्ष पदाधिकाऱ्यांच्या मागणीनुसार मंत्री थोरात यांनी जिल्हाधिकाऱ्यांना बैठक बोलवण्यास सांगितले. त्यानुसार प्रशासनाच्या सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या लेखी सुचना दिल्या गेल्या. मात्र त्यात लष्करी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचा समावेशच नव्हता. पक्षाचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे, छावणी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार सिंह तसेच विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीची नियोजित वेळ दुपारी दोनची होती व स्थळ नियोजन भवन होते. तसे निरोपही दिले गेले. मात्र प्रत्यक्षात मंत्री थोरातच नगरमध्ये आले ते सायंकाळी साडेचार वाजता. बैठकीचे ठिकाणही ऐनवेळी बदलुन ते सरकारी विश्रामगृह करण्यात आले.
सन २००६ मध्ये भिंगारला क वर्ग पालिकेचा दर्जा दिला गेला, मात्र त्याचे फायदे मिळत नाहीत, धोकादायक झालेल्या पोलीस ठाण्याच्या इमारतीचे स्थलांतर, भिंगार वेशीजवळ वाहतूक पोलीस नियुक्त करणे, एमआयडीसी भिंगारला व्यावसायिक दराने पाणी पुरवठा करत असल्याने दर कमी व्हावेत, बसस्थानक स्वच्छ करुन तेथे गाडय़ा थांबवाव्यात, भुईकोट किल्ल्याच्या सुशोभिकरणाचे बंद पडलेले काम पुन्हा सुरु करावे, कापुरवाडी तलावातील गाळ काढल्यास भिंगारसह इतर गावांनाही पुरवठा होऊ शकेल, लष्कराची जड वाहतुक भिंगार गावाबाहेरहुन व्हावी आदी मागण्यांचे निवेदन पदाधिकाऱ्यांनी दिले.
थोरात यांनी प्रश्न सविस्तर ऐकुन घेतले मात्र, कार्यकर्तेही तळमळीने त्याची सविस्तर माहिती देत होते. मात्र कोणत्याही प्रश्नाला ठोस उत्तर मिळाले नाही. आर. आर. पिल्ले, मंडळाचे उपाध्यक्ष कलीम शेख, सुनिल पतके, भिंगार बँकेचे अध्यक्ष गोपाळराव झोडगे, साहेबराव चौधरी, रिझवान शेख आदींनी चर्चेत भाग घेतला. नगरसेवक धनंजय जाधव, अनंत देसाई, इंटकचे जिल्हाध्यक्ष अभिजित लुणिया, शहराध्यक्ष बाळासाहेब भुजबळ आदी उपस्थित होते.