मुंबईसारख्या महानगरात यांत्रिक जीवन जगताना माणसाची निसर्गाशी नाळ तुटते आणि संवेदनशीलता हरवते. पण ही संवेदनशीलता जिवंत ठेवण्याचे काम करणारे पक्षी याच शहरात पाहायला मिळतात, याची जाणीव गुरुवारी एका पक्षितज्ज्ञाने करून दिली. शिवडीच्या खाडीतील मनमोहक फ्लेमिंगो ज्यांनी पाहिले नाहीत त्यांनी मुंबईच पाहिली नाही, अशी एक अभिनव व्याख्याही त्यांनी या निमित्ताने केली.
मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वार्तालाप कार्यक्रमात पक्षितज्ज्ञ डॉ. श्रीरंग बखले यांचा ‘आपले पक्षी’ हा दृक्श्राव्य कार्यक्रम झाला. आज शहरातील अनेक मुलांना पक्षी ओळखता येत नाहीत. मात्र पक्षी बघण्यासाठी दूर जंगलात जायची गरज नाही; डोळे आणि कान उघडे ठेवले तर मुंबईत ठिकठिकाणी असलेले पक्षी पाहता येतात आणि ऐकायला मिळतात. अगदी आपल्या घराच्या जवळपासही पक्षी आहेत, पण बोरिवलीचे राष्ट्रीय उद्यान, पवई आयआयटी आणि हिरानंदानी येथे त्यांचे प्रमाण बरेच असल्याची माहिती त्यांनी दिली. स्वत:चे घर तयार करण्यासाठी झाडाला छिद्र पाडणारा, कपाळावर जणु मळवट ल्यालेला आणि पानांच्या रंगात लपणारा तांबट, शहरी पक्षी असलेली मैना, दिलखेचक नृत्य करणारा दयाळ, पिवळाधमक हळद्या, निवडून फळे खाणारा फळवाघुळ, कोतवाल, भारद्वाज, विणीचं घरटं तयार करणारा शिंपी, तुरुतुरु धावणारा धोबी आणि जपानी पद्धतीचे पंख हलवणारा व सुंदर घरटे बांधणारा नाचण (नाचरा) अशा विविध पक्षांची माहिती डॉ. बखले यांनी दिली. सकाळी साडेसहा ते साडेसात या वेळेत पक्षी खाद्याच्या शोधात असतात. त्यामुळे या वेळेत आपल्या जवळच्या झाडांकडे लक्ष ठेवा, असा सल्ला बखले यांनी दिला. हव्या त्या झाडावर बसून हवी ती फळे खाणाऱ्या मुक्त पोपटाला लोक पिंजऱ्यात ठेवतात हे दुर्दैव असल्याचा उल्लेख त्यांनी केला. पक्ष्यांची पिलं मोठी होताना पाहण्याचा अनुभव काही निराळ्याच आपुलकीचा असतो याचीही जाणीव त्यांनी करून दिली.
इंग्लंडमध्ये फुलपाखरांच्या ५७ जाती आहेत, तर एकटय़ा बोरिवली उद्यानात १०५ आहेत, तरीही ते ‘बटरफ्लाय डे’ साजरा करतात आणि आपण फुलपाखरांना मारतो याबद्दल डॉ. बखलेंनी खंत व्यक्त केली. घरी फुलपाखरं बघायची असतील तर झाडे लावा असा सल्ला देतानाच, झाडं असल्यामुळे एकोणिसाव्या मजल्यावर टेरेस गार्डनवरही फुलपाखरं येतात असे उदाहरण त्यांनी दिले. गाणं गाणारी कोकिळा नसून कोकीळ असतो, त्यामुळे लता मंगेशकरांना ‘गानकोकिळा’ म्हणणे चुकीचे असल्याचे ते म्हणाले. थोडक्यात, डोळ्यांना सुख आणि मनाला शांती देणाऱ्या पक्ष्यांशी नाते जोडा असा संदेश डॉ. बखले यांनी सुमारे ६० पक्ष्यांचे दर्शन घडवणाऱ्या लहान-लहान व्हिडिओजच्या मदतीने दिला.
संग्रहित लेख, दिनांक 27th Feb 2014 रोजी प्रकाशित
पक्षी संवेदनशीलता जिवंत ठेवण्याचे काम करतात – डॉ. श्रीरंग बखले
मुंबईसारख्या महानगरात यांत्रिक जीवन जगताना माणसाची निसर्गाशी नाळ तुटते आणि संवेदनशीलता हरवते. पण ही संवेदनशीलता जिवंत ठेवण्याचे काम करणारे पक्षी याच शहरात पाहायला मिळतात, याची जाणीव गुरुवारी एका पक्षितज्ज्ञाने करून दिली.
First published on: 27-02-2014 at 01:05 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bird work to keep the alive sensitivity