scorecardresearch

पक्षात ‘वसंत’ फुलविण्यासाठी

मनसे प्रदेश सरचिटणीसपदाचा राजीनामा देणारे माजी आमदार वसंत गिते यांना आपल्या पक्षात आणण्यासाठी भाजप व शिवसेनेकडून जोरदार प्रयत्न सुरू झाले असून त्या अनुषंगाने या दोन्ही पक्षांच्या

सेना, भाजपचे प्रयत्न
मनसे प्रदेश सरचिटणीसपदाचा राजीनामा देणारे माजी आमदार वसंत गिते यांना आपल्या पक्षात आणण्यासाठी भाजप व शिवसेनेकडून जोरदार प्रयत्न सुरू झाले असून त्या अनुषंगाने या दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी मंगळवारी गिते यांची भेट घेऊन त्यांचे मन वळविण्याचे प्रयत्न केले. भाजपने गिते यांची भेट घेतल्याचे मान्य करून अशा स्वरुपाची चर्चा मात्र झाली नसल्याचा दावा केला. आमदार निवासातील खोलीच्या चावीसाठी भेट घेण्यात आल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे शिवसेनेने गिते यांची वरिष्ठ नेत्यांशी थेट चर्चा घडवून आणत पुढील दोन दिवसात ते पक्षात येतील असा विश्वास व्यक्त केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पाश्र्वभूमीवर घडणाऱ्या या घडामोडींमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

सारे काही ‘चावी’साठी
वसंत गिते यांना भाजपमध्ये आणण्याच्या दृष्टिकोनातून स्थानिक पदाधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरू असून शिवसेनेच्या पाठोपाठ भाजपच्या नेत्यांनी देखील मंगळवारी गिते यांची भेट घेऊन चर्चा केली. तथापि, ही भेट पक्षात येण्याबाबत नसून आमदार निवासातील गिते यांच्या कक्षाची चावी मिळावी म्हणून होती, अशी सारवासारव भाजपच्या नेत्यांना करावी लागली. विधानसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत गिते यांनी सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर भाजपने गिते यांच्यासह पक्षातील २० ते २५ नगरसेवक भाजपमध्ये येण्यास इच्छुक असल्याचे सांगितले होते. यामुळे गिते भाजपमध्ये जाणार की काय, अशी वंदता असतानाच मंगळवारी भाजपचे उत्तर महाराष्ट्र समन्वयक विजय साने व आमदार बाळासाहेब सानप यांनी गिते यांची भेट घेतली. या भेटीने वेगळेच तर्क मांडण्यास सुरूवात झाली असली तरी संबंधितांनी ही भेट वेगळ्याच कारणासाठी असल्याचा बचाव केला. गिते हे आमदार असताना आमदार निवासातील एक निवासी कक्ष त्यांच्याकडे होता. त्याचे स्वरुप कसे होते, तो चांगला असल्यास नवनिर्वाचित आमदार सानप यांच्यासाठी तो घेण्याचा विचार असल्याचे साने यांनी नमूद केले. गिते यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यासंदर्भात आदल्या दिवशीच चर्चा झाली होती. या भेटीत त्यावर पुन्हा नव्याने काही चर्चा झाली नाही. केवळ आमदार निवासातील निवास कक्षाची चावी मिळेल का, याची विचारणा करण्यात आली. ती चावी अन्य कोणाकडे असून गिते यांनी ती देण्याची तयारी दर्शविल्याचे साने यांनी नमूद केले. दरम्यान गितेंसह मनसेच्या नगरसेवकांना गळाला लावण्याच्या या प्रयत्नांना भाजपमधून विरोधही होत आहे. गितेंना पराभूत करून निवडून आलेल्या नाशिक मध्य मतदारसंघाच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी आता मनसेच्या नगरसेवकांना पक्षात घेऊन काय साधले जाणार, असा प्रश्न उपस्थित केला आहे. भाजपमध्ये महापालिका निवडणूक लढवू शकतील, असे अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी आहेत. मनसेच्या नगरसेवकांना भाजपमध्ये घेतल्यास भाजपच्या कार्यकर्त्यांची संधी डावलली जाईल, याकडे प्रा. फरांदे यांनी लक्ष वेधले. भाजपचे शहराध्यक्ष व सर्व पदाधिकारी एकत्रित विचार विनिमय करून त्यासंदर्भात योग्य तो निर्णय घेतील, असे त्यांनी सांगितले. मनसेच्या नगरसेवकांना भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यास काय, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

गिते-साने यांचा दोस्ताना
मनसेचे वसंत गिते आणि भाजपचे उत्तर महाराष्ट्र समन्वयक विजय साने यांचा दोस्ताना सर्वश्रृत आहे. अनेक दिवसांपासून गिते यांनी भाजपमध्ये यावे म्हणून साने हे प्रयत्न करत होते. गिते यांनी सरचिटणीसपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्यासह मनसेचे २० ते २५ नगरसेवक भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा साने यांनी केला. शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात जनमत भाजपच्या बाजूने आणि मनसेच्या विरोधात असतानाही साने यांचे हे प्रयत्न का सुरू आहेत याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगली आहे.
विधानसभा निवडणुकीत गिते यांनी नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली. त्यावेळी भाजप उमेदवाराच्या प्रचाराकडे साने यांनी दुर्लक्ष केल्याची काही जणांची तक्रार आहे. म्हणजे ते या मतदार संघात प्रचारार्थ फिरकले नाहीत. याद्वारे त्यांनी गितेंना वाट मोकळी करून देण्याचा प्रयत्न केल्याची कार्यकर्त्यांची तक्रार आहे.
विधानसभा निवडणुकीत गिते पराभूत झाल्यानंतरही साने यांनी त्यांना पक्षात आणण्याचे प्रयत्न सोडले नाही हे या घटनेने दर्शविले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

शिवसेनेचा जोर
मनसेच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यासाठी माजी आमदार वसंत गिते यांना स्वगृही आणण्याकरिता शिवसेनेने जोर लावला आहे. त्या अनुषंगाने शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी भाभानगर येथील निवासस्थानी गिते यांची भेट घेतली. वरिष्ठ नेत्यांशी भ्रमणध्वनीवरून गितेंची चर्चा घडवून आणली. पुढील दोन दिवसात गिते शिवसेनेत म्हणजे आपल्या मूळ पक्षात दाखल होतील, असा विश्वास भेट घेणाऱ्या नेत्यांनी व्यक्त केला. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत गिते हे पराभूत झाले. पराभवाची जबाबदारी स्वीकारून आपण मनसेच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मागील काही महिन्यांपासून राज व गिते यांच्यातील संबंध दुरावत गेले. त्याचे प्रत्यंतर राजीनामा नाटय़ातून आल्यावर शिवसेना सक्रिय झाली. आदल्या दिवशी सेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी गितेंशी संपर्क साधला होता. मंगळवारी शिवसेनेचे माजी महापौर विनायक पांडे, नगरसेवक शिवाजी सहाणे, विलास शिंदे, बाळासाहेब कोकणे आदी पदाधिकारी गिते यांच्या निवासस्थानी धडकले. भाभानगर येथील गिते यांच्या निवासस्थानी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. जवळपास अर्धा तास ही चर्चा झाल्याचे सांगितले जाते. गिते यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यास त्यांचे स्वागतच होईल हा संदेश या भेटीत दिला गेल्याचे पांडे यांनी सांगितले. यावेळी वरिष्ठ नेत्यांशी त्यांची चर्चा घडवून आणली गेली. राज ठाकरे यांच्या पक्षात स्थापनेपासून गिते यांनी काम केले आहे. त्याआधी ते शिवसेनेत होते. ठाकरे कुटुंबियांसोबत काम करणारी कोणतीही व्यक्ती अन्य पक्षाचा विचार करू शकत नाही. यामुळे पुढील दोन दिवसात योग्य निर्णय घेऊन ते शिवसेनेत अर्थात स्वगृही परततील, असा विश्वास पांडे यांनी व्यक्त केला.

मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त ( Nasik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp and sena woo vasant gite of mns

ताज्या बातम्या