मुंबईवर भगवा..भाजपचा!

एका बाजूला ढोल-ताशाचा गजर, तर दुसरीकडे डीजेचा ठणठणाट, अबालवृद्धांचे थिरकणारी पावले, फटाक्यांची आतशबाजी अन् उमेदवारांचे आगमन होताच कानी पडणारे तुतारीचे स्वर..

एका बाजूला ढोल-ताशाचा गजर, तर दुसरीकडे डीजेचा ठणठणाट, अबालवृद्धांचे थिरकणारी पावले, फटाक्यांची आतशबाजी अन् उमेदवारांचे आगमन होताच कानी पडणारे तुतारीचे स्वर.. हे चित्र होते नरिमन पॉइंट येथील भाजप मुख्यालयातील. लोकसभा निवडणुकीत मुंबईसह राज्यात घवघवीत यश मिळाल्यानंतर पाच महिन्यांत विधानसभा निवडणुकीत भगवा फडकला. मुंबईवरही भगवा फडकला..पण हा भगवा भाजपचा होता.स्वबळावर भगवा फडकवताना कार्यकर्त्यांचा उत्साह टीपेला पोहोचला होता. दहिसरपासून कुलाब्यापर्यंत भाजपचा भगवा फडकला होता..
मतमोजणीच्या पूर्वसंध्येला भाजप कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालय आणि आसपासच्या परिसरात भगवे-हिरवे झेंडे, कापडी पताकांनी सारा परिसर सजवून टाकला होता. त्यामुळे हा परिसर भगवामय दिसत होता. भाजपची साथ न सोडणाऱ्या रिपाईचे झेंडे भगव्यांमध्ये फडकताना दिसत होते. निवडणुकीच्या निकालाचा कौल पाहण्यासाठी भाजप कार्यालयाबाहेर मोठय़ा स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली होती. रविवारी सकाळपासूनच भाजपच्या कार्यकर्त्यांनी मुख्यालयाबाहेर गर्दी करायला सुरुवात केली होती. भाजप १०० हून अधिक जागांवर आघाडीवर असल्याचे चित्र सकाळपासूनच दिसत होते. त्यामुळे कार्यकर्त्यांचा आनंद वाढत चालला होता. हळूहळू निकाल घोषित होऊ लागले. भाजप उमेदवार विजयी झाल्याचे वृत्त समजताच ढोल-ताशाचा आवाज घुमत होता. त्याबरोबर कार्यकर्त्यांची पावलेही थिरकत होती. विजयी उमेदवार मुख्यालयात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी येताच एकच जल्लोष होत होता. विजयी उमेदवारांचे तुतारीच्या निनादात स्वागत केले जात होते. मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन करून उमेदवार पदाधिकाऱ्यांशी गळाभेटी करीत होते. एवढय़ात भाजपला राष्ट्रवादी बाहेरून पाठींबा देणार असल्याचे वृत्त झळकले आणि उत्साहाचा जोर चर्चेत उमटला. पण ही चर्चा थोडाच वेळ चालली. थोडय़ा वेळातच ही चर्चा बाजूला सारून कार्यकर्ते पुन्हा एकदा विजयोत्सवामध्ये सहभागी झाले.
पक्षाच्या मुख्यालयाबरोबरच शहरातही अनेक भागांमध्ये भाजपचे ध्वज फडकवित गाडय़ा फिरत होत्या. भाजप कार्यालयांबाहेर कार्यकर्ते फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण करीत विजयोत्सव साजरा करीत होते. त्यात महिला कार्यकर्त्यांची उपस्थितीही लक्षणीय होती. काही ठिकाणी भगव्या साडय़ा परिधान केलेल्या भाजप कार्यकर्त्यां विजयोत्सवात सहभागी झाल्या होत्या. एकूण अवघी मुंबईच भाजपमय झाली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bjp cadre celebrate election victory in mumbai

ताज्या बातम्या