आगामी सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधात भाजपचे नेते अॅड. शरद बनसोडे यांनी लढण्यास पुन्हा एकदा नकार दर्शविला असून, राजकारणापेक्षा समाजकारणच बरे असल्याचे मत व्यक्त केले. त्यामुळे सोलापूरच्या या राखीव मतदारसंघात शिंदे यांच्या विरोधात भाजपला अन्य उमेदवार शोधावा लागणार आहे.
मागील २००९ सालच्या सोलापूर लोकसभा निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांच्या विरुद्ध भाजपतर्फे अॅड. शरद बनसोडे यांनी लढत दिली होती. पराभवाचा अनुभव घेतल्यानंतर बनसोडे यांनी भाजपच्या व्यासपीठावर येण्यापेक्षा स्वत: स्थापन केलेल्या स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर मंचच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यावर भर दिला होता. अलीकडे यांनी सावरकर विचार मंचचे कामही कमी केले होते. या पाश्र्वभूमीवर गेल्या जुलै महिन्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अॅड. बनसोडे यांची भेट घेऊन त्यांच्याशी बंद खोलीत चर्चा केली होती. त्यानंतर अॅड. बनसोडे यांनी राजकारणात सहभागी न होता सामाजिक सेवा करण्याचा मनोदय बोलून दाखविला होता. त्यामुळे ते पुन्हा सोलापूर लोकसभेची निवडणूक लढविणार नसल्याचे स्पष्ट झाले असतानाच गेल्या महिन्यात देशात एकंदरीत काँग्रेसविरोधी नकारात्मकतेचे वातावरण व भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी देशभरात माजविलेले रण विचारात घेता अॅड. बनसोडे यांनी आपला विचार बदलून पुन्हा लोकसभा निवडणूक लढविण्याचा मनोदय बोलून दाखविला होता. त्यासाठी योगगुरू बाबा रामदेव यांनी प्रेरणा दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.
तथापि, अॅड. बनसोडे यांनी आपल्या भूमिकेत पुनश्च बदल केला असून, निवडणुकीचे राजकारण आपणास मानवणार नसल्याचे व समाजकारणात रममाण होण्याचे संकेत दिले आहेत. आपल्याकडे लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा उमेदवार म्हणून पाहिले जात असले तरी आपण निवडणूक लढविण्याची कसलीही तयारी केली नाही. राजकारणापासून दूर होण्याचा सल्ला शरद पवार यांनी दिला नव्हता. त्यांच्या भेटीत राजकीय चर्चा झाली नाहीतर व्यावसायिक विषयावर संवाद झाला होता, असे स्पष्टीकरण अॅड. बनसोडे यांनी दिले. आपण निवडणूक लढविणार नसलो तरी भाजपमध्ये राहणार आहोत. भाजपचा टिळा पुसणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.
संग्रहित लेख, दिनांक 5th Feb 2014 रोजी प्रकाशित
सोलापूर लोकसभा निवडणुकीपासून भाजपचे शरद बनसोडे दूर राहणार
आगामी सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधात भाजपचे नेते अॅड. शरद बनसोडे यांनी लढण्यास पुन्हा एकदा नकार दर्शविला असून, राजकारणापेक्षा समाजकारणच बरे असल्याचे मत व्यक्त केले.
First published on: 05-02-2014 at 03:30 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjps sharad bansode be away from solapur lok sabha election