इंटरनेटच्या आधारे शिक्षकांचा बेशरमपणा!
उस्मानाबाद तालुक्यातील येडशी येथील जनता महाविद्यालयातील मुलींनी छेडछाडीला कंटाळून महाविद्यालयात जाणे बंद केल्याचे प्रकरण नुकतेच घडले असतानाच पळसप येथील जिल्हा परिषद शाळेतील संगणकामध्ये अश्लील चित्रपट व छायाचित्रे आढळून आली आहेत. हा प्रकार कळताच पालकांनी शाळेत जाऊन गोंधळ घालत दोषी शिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी केली. कारवाई होईपर्यंत मुलांना शाळेत न पाठवण्याचा निर्णय गावातील पालकांनी घेतला आहे. मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे यांचे मूळ गाव असलेल्या पळसप येथेच ही घटना निदर्शनास आल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.
विद्यार्थी संगणक साक्षर व्हावे, या हेतूने सरकारने जिल्हा परिषद शाळांमध्ये संगणक कक्ष सुरू केले. परंतु उस्मानाबाद तालुक्यातील पळसप येथील जि. प. शाळेतील संगणकात चक्क अश्लील चित्रपट व नग्न छायाचित्रे आढळल्याचा प्रकार उघड झाला. या शाळेतील काही शिक्षक या संगणकाचा वापर अश्लील चित्रपट आणि नग्न छायाचित्रे पाहण्यासाठी करीत असल्याची चर्चा आहे. हा प्रकार पालकांना समजताच त्यांनी संगणक कक्षात जाऊन संगणक तपासल्यावर ही बाब खरी असल्याचे उघडकीस आले.
पळसप येथील शाळेत संगणकासाठी इंटरनेट आहे. त्यातून काही शिक्षक ‘ब्लू फिल्म’ डाऊनलोड करून पाहत होते. त्या फिल्म संगणकामध्ये तशाच होत्या. शाळेतच तेही शिक्षकच असा घृणास्पद प्रकार करीत असल्याने त्याचा वाईट परिणाम विद्यार्थ्यांवर होणार असल्यामुळे या दोषी शिक्षकांवर कारवाई करावी, अशी मागणी संतप्त पालक करीत आहेत. शिक्षकांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत मुलांना शाळेत न पाठवण्याचा निर्णय पालकांनी घेतला आहे.