गणेश पूजनाच्या नावाखाली मोठय़ा उत्सवांचे आयोजन करायचे आणि उत्सवांना चोरीच्या विजेचा झगमगाट करणाऱ्या सुमारे २००हून अधिक मंडळांच्या मुसक्या यंदा महावितरणच्या भरारी पथकाने आवळल्या आहेत. ठाणे, कल्याण-डोंबिवली परिसरांतील अशा मंडळांवर गुन्हा दाखल करण्याचा सपाटा सुरू केला आहे.  दादागिरीच्या बळावर गणेश निधी उभा करणाऱ्या मंडळांचे प्रताप यापूर्वीच उघड झाले असताना काही ठिकाणी वीज वाहिन्यांवर आकडा टाकून तर विद्युत दिव्यांवर चोरीने वीज घेणाऱ्या गणेश मंडळांचे धाबे या कारवाईमुळे दणाणले आहेत.
गणेशोत्सवाच्या काळात डीजेचा दणदणाट, गल्ली आणि रस्त्याच्या दुतर्फा केलेली विद्युत रोषणाई आणि सजावटीतील रोषणाई या सगळ्यांसाठी नेहमीपेक्षा जास्त वीज वापरली जाते. ठाणे, कल्याण, डोंबिवली, बदलापूर या शहरांमध्ये महावितरणकडून गणेशोत्सवाच्या काळात तात्पुरती वीज जोडणी घेतली जाते.  एकूण मंडळांच्या तुलनेत ही संख्या अत्यंत कमी असून अनेक ठिकाणी बेकायदेशीरपणे वीजेचा वापर सुरू असल्याचे यापूर्वी उघड झाले आहे. भांडुप परिमंडळातून ठाणे, भांडुप आणि मुलुंड शहरांमध्ये ४८८ मंडळांना तर कल्याण-डोंबिवली या भागांतील ३८८ मंडळांना आत्तापर्यंत तात्पुरते मीटर देण्यात आले आहे. असे असूनही गणेशोत्सवाच्या काळात विजेची चोरी आणि अनधिकृत वापर वाढला असल्याचे महावितरणने केलेल्या कारवाईमुळे उघड झाले आहे. अशा वीजचोर मंडळांवर कारवाई करण्यासाठी महावितरणने मध्यंतरी दामिनी पथक स्थापन केले होते. या पथकाने गेल्या सात दिवसांत २००हून अधिक मंडळांना वीजचोरी करताना पकडले आहे. कल्याण-डोंबिवली शहरांमध्ये दामिनी पथकाने सुमारे १६८  मंडळांच्या मंडपामध्ये भेटी देऊन त्यांचा वापर तपासला आहे. त्या वेळी सुमारे ७१ मंडळांकडून अनधिकृत वीज वापर केला जात असल्याने त्यांच्यावर कारवाई करत त्यांना तात्पुरत्या मीटरची व्यवस्था देण्यात आली, तर कल्याण मंडळ दोनमधील दोन मंडळांवर पथकाने दंडात्मक कारवाई केली आहे. ठाणे मंडळातील २८ मंडळांवर दामिनी पथकाने कारवाई केल्याची माहिती महावितरणच्या वतीने देण्यात आली.  पथकाच्या वतीने विद्युत कायद्याच्या वीजचोरी आणि विजेचा अनधिकृत वापर या दोन प्रकारच्या कारवाई केल्या जात असून त्यामध्ये अनेक मंडळे सापडत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bmc taking action on electricity thief circles
First published on: 17-09-2013 at 07:26 IST