कुर्ला रेल्वे स्थानकाच्या पूर्वेस असलेल्या पोलीस चौकीसभोवती असलेला फेरीवाल्यांचा विळखा हटविण्यासाठी पोलिसांच्या तसेच स्थानिक नगरसेविकेच्या तक्रारींना पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या आहेत. पालिका अधिकाऱ्यांच्या असहकारामुळेच केवळ चार दिवस मोकळा झालेला रस्ता पुन्हा फेरीवाल्यांनी आपल्या ताब्यात घेतला असून त्यांच्या दादागिरीला ऊत आला आहे.
कुर्ला रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या बीट चौकीला फेरीवाल्यांचा विळखा पडल्याचे वृत्त लोकसत्तामध्ये ५ डिसेंबर रोजी प्रकाशित झाल्यावर खडबडून जागे झालेल्या नेहरूनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठांनी तात्काळ कारवाई करत अनेक फेरीवाल्यांना दंड ठोठावला. पालिकेच्या एल विभागाला पत्र लिहून कारवाई करण्याचे आणि त्याला सहकार्य करण्याची तयारी असल्याचेही वरीष्ठ निरीक्षक एस. पी. भवर यांनी सहाय्यक पालिका आयुक्त काळे यांना कळविले होते. तथापि, सलग चार दिवस पोलिसांनीच कारवाई केल्यावरही पालिकेकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. या फेरीवाल्यांना तेथील दोन स्थानिक स्वयंघोषित नेत्यांचे संरक्षण असून संबंधित वृत्त प्रकाशित झाल्याच्या चार दिवसांनंतर फेरीवाल्यांनी आपले अतिक्रमण पुन्हा केलेच पण तेथून जाणाऱ्या-येणाऱ्या नागरिकांना दादगिरी करण्यास सुरुवात केली आहे.
या संदर्भात स्थानिक नागरिकांनी पोलिसांकडे आणि पालिकेकडे लेखी तक्रारी केल्या. स्थानिक नगरसेविका संजना मुणगेकर यांनी पालिकेला केवळ रेल्वे स्थानकाचा परिसरच नव्हे तर संपूर्ण स. गो. बर्वे मार्गावरील फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई करण्याचे पत्र पाठवले. तथापि, पालिकेकडून कोणतीही कारवाई झाली नसल्याचे मुणगेकर यांनी सांगितले. आपण वारंवार प्रभाग समितीच्या बैठकीमध्ये हा विषय उपस्थित केला आहे. मात्र त्यावर पालिकेकडून कोणतेही उत्तर देण्यात येत नसल्याचे त्यांनी सांगितले.
पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक भवर यांनी सांगितले की, आम्ही पालिकेच्या कारवाईला संरक्षण देण्यास तयार आहोत. पण अद्याप पालिकेकडून तशी मागणीच झालेली नाही. आम्ही फेरीवाल्यांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करतो ती अत्यंत किरकोळ असते. पालिकेने कडक कारवाई केल्यास फेरीवाले तेथून दूर होतील. नागरिकांना दमदाटी केल्याच्या तक्रारी आल्या असल्या तरी कोणीही लेखी तक्रारी केलेल्या नाहीत.
मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त सीताराम कुंटे यांनी अलिकडेच नेहरुनगर आणि कुर्ला परिसराची पाहणी केली होती. त्यावेळी येथील सर्व फेरीवाले हटविण्यात आले होते. मात्र अवघ्या काही तासांतच हे फेरीवाले पुन्हा आपल्या जागेवर आणखी विस्तारून बसले असून पालिका अधिकाऱ्यांच्या असहकारामुळेच ये रे माझ्या मागल्या स्थितीचा अनुभव रहिवाशांना मिळत आहे.