शहरातील भगवान पॅरामेडिकल कनिष्ठ महाविद्यालयाने सहा विद्यार्थ्यांचे मूळ प्रमाणपत्र गहाळ केल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विभागीय सचिवांनी महाविद्यालय प्रशासनास नोटीस बजावली.
गहाळ झालेल्या प्रमाणपत्राविषयी उच्च माध्यमिक शिक्षण मंडळास पत्रव्यवहार केला असला तरी नव्याने ते बनवून देता आले असते. असे गहाळ झालेले प्रमाणपत्र बनवून देण्याचा कालावधी संपल्याने नोटीस बजावण्यात आली. मूळ प्रमाणपत्र देण्यासाठी महाविद्यालयाने पैशांची मागणीही करू नये, असेही नमूद करण्यात आले आहे. शहरातील भगवान पॅरामेडिकल कनिष्ठ महाविद्यालयात शिकणारे श्रीहरि लोखंडे, शेख नवीद शेख अब्दुल गणी, शेख मोहम्मद अथर मोहम्मद युनुस, चंद्रकला शिंदे, विवेक शेळके, सगुणा वाकुळे या विद्यार्थ्यांचे मूळ प्रमाणपत्र महाविद्यालयाकडून गहाळ झाले. वारंवार मागणी करूनही ते विद्यार्थ्यांना मिळाले नाही. जनजागरण समितीचे मोहसीन अहमद यांनी पाठपुरावा करून हे प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. या प्रकरणी महाविद्यालयास कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.