शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अमर रहे.. अशा घोषणा देत शेकडो शिवसैनिकांनी आज बाळासाहेब ठाकरे यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. शिवसेना कार्यालयासमोर झालेल्या सर्वपक्षीय श्रद्धांजली कार्यक्रमात विविध पक्षाच्या नेत्यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देत भावना व्यक्त केल्या.  
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अस्थिकलश आज सकाळी नागपुरात आल्यावर रेल्वे स्थानकावर शेकडो शिवसैनिकांनी आणि प्रवाशांनी अस्थिकलशाचे दर्शन घेतले. बाळासाहेब ठाकरे अमर रहे.. शिवसेना जिंदाबाद अशा घोषणा देत अस्थिकलश रेल्वे स्थानकावरून मानस चौक, सीताबर्डी मुख्य मार्ग, व्हेरायटी चौक, मुंजे चौक, लोहा पूल, कॉटेन मार्केट, आग्याराम देवी, टिळक पुतळा, शिवाजी पुतळा, महाल, झेंडा चौक, चिटणवीसपुरा, जुनी शुक्रवारी, गजानन महाराज, सक्करदरा चौक, छोटा ताजबाग, शारदा चौक मार्गे रेशीमबागमधील शिवसेनेच्या कार्यालयात आल्यावर त्या ठिकाणी श्रद्धांजली सभा घेण्यात आली. शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख छोटू देसाई, जिल्हा प्रमुख शेखर सावरबांधे मुंबईवरून तीन अस्थिकलश घेऊन आल्यानंतर आमदार आशिष जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली रामटेकमध्ये आणि माजी खाासदार प्रकाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली काटोल आणि कळमेश्वर परिसरात अस्थिकलश नेण्यात
आले. त्या ठिकाणी हजारो शिवसैनिकांनी आणि नागरिकांनी अस्थिकलशाचे दर्शन घेतले. रेशीमबागमधील शिवसेना भवनासमोर झालेल्या सभेत संपर्क प्रमुख छोटू देसाई म्हणाले, अनेक शिवसैनिकांना बाळासाहेबांचे अंत्यदर्शन घेता आले नाही. त्यामुळे बाळासाहेबांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेता यावे नागपूर जिल्ह्य़ात तीन अस्थिकलश आणण्यात आले.
दरम्यान, रेल्वेस्थानकावरून अस्थिकलश भारतीय जनता पक्षाच्या टिळक पुतळ्याजवळील कार्यालयात ठेवण्यात आला. या ठिकाणी महापौर अनिल सोले, माजी खासदार बनवारीलाल पुरोहित, शहर अध्यक्ष कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, गिरीश व्यास, संदीप जोशी, प्रवीण दटके, दयाशंकर तिवारी, अ‍ॅड. नितीन तेलगोटे, विक्की कुकरेजा, महेंद्र कटारिया, बंटी कुकडे, कीर्तीदा अजमेरा आदींनी दर्शन घेतले.
उद्या गुरुवारी दिवसभर शिवसेना भवनात अस्थिकलश ठेवण्यात येणार असून २३ नोव्हेंबरला दुपारी रामटेकमध्ये अंबाळा तलावात अस्थिकलशाचे विसर्जन करण्यात येणार आहे.