प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना तब्बल दीड महिन्यानंतर पुस्तके मिळणार आहेत,  पण अजूनही पहिलीच्या वर्गाचे गणिताचे पुस्तक मिळायला आणखी कालावधी लागणार आहे.
जिल्हा परिषदेने पहिलीपासून सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू केले. त्यामुळे पुस्तके मिळण्यास विलंब झाला. शाळा सुरू झाल्यानंतर तब्बल दीड महिन्याने शिक्षण विभागाला पुस्तके मिळाली. आता ही पुस्तके शिक्षकांपर्यंत पोहोच केली जात आहेत. येत्या सोमवारपासून विद्यार्थ्यांना पुस्तके मिळणार आहेत. दीड महिना शिक्षक हे संभाव्य अभ्यासक्रमाच्या आधारे विद्यार्थ्यांना शिकवत होते.
दरम्यान, विद्यार्थ्यांना विलंबाने पुस्तके देण्यामागे खासगी इंग्रजी माध्यामाच्या शाळांचे चालक जबाबदार आहेत. अनेक राजकीय नेत्यांच्या या शाळा आहेत. जिल्हा परिषद त्यांच्याच ताब्यात आहे. त्यांच्या शाळा सुरळीत चालाव्यात, प्रवेश पूर्ण व्हावेत व प्राथमिक शाळा बंद पडाव्यात म्हणून पुस्तके उशिरा देण्याचा कट करण्यात आला असा आरोप छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन पटारे यांनी केला आहे.
पुस्तके उशिरा मिळाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. ते कसे थांबविणार याचा खुलासा राजकीय नेते व अधिका-यांनी करावा, अशी मागणी पत्रकात करण्यात आली असून त्यावर छावा संघटनेचे प्रवीण देवकर, मनोज आसने, विशाल आदिक, श्रीकांत पटारे यांच्या सह्या आहेत.