कोल्हापूर शहरातील आयआरबी कंपनीने केलेल्या रस्त्यांच्या कामांची चर्चा करण्यासाठी उद्या शुक्रवारी आयोजित केलेल्या बैठकीचे भवितव्य अंधकारमय झाले आहे. टोलविरोधी कृती समितीने ही बैठक कोल्हापुरात व्हावी, असा आग्रह धरीत मुंबईच्या बैठकीला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. एकाअर्थाने कृती समितीचा राजधानीतील बैठकीवर बहिष्कारच आहे. तर, गुरूवारी टोलविरोधी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी राजाराम माने यांची भेट घेऊन रस्त्यांच्या कामांतील गैरव्यवहारांची सविस्तर माहिती व निकृष्ट कामांचा अहवाल सादर केला. तासाहून अधिक काळ ही बैठक सुरू होती.
कोल्हापूर शहरामध्ये आयआरबी कंपनीने रस्ते विकासाचे काम केले आहे. २२० कोटी रूपयांचा हा प्रकल्प निकृष्ट दर्जामुळे वादात सापडला आहे. शहरातील अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे खराब झाल्याने व त्यामध्ये उणिवा असल्याने शासनाकडे तक्रारी केल्या आहेत. प्रकल्पाच्या कामाच्या दर्जावरून जनआंदोलन सुरू झाले आहे. दरम्यान, शासकीय पातळीवर टोल आकारणी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.ही माहिती समल्यावर कोल्हापुरात पुन्हा एकदा नव्याने जनआंदोलन सुरू झाले आहे. या पाश्र्वभूमीवर १ फेब्रुवारी रोजी मुंबई येथे टोलविरोधी कृती समिती, रस्त्यांच्या कामांचा अहवाल बनवलेल्या तज्ज्ञ समितीचे सदस्य व वरिष्ठ शासकीय अधिकारी यांची संयुक्त बैठक आयोजित केली आहे. मुंबईत होणाऱ्या या बैठकीस टोलविरोधी कृती समितीचा विरोध आहे. मुंबईत वातानुकूलित दालनात बसून निकृष्ट कामांची चर्चा करण्याऐवजी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोल्हापुरातील रस्त्यांच्या कामांचा बोजवारा कसा उडाला आहे, याची पाहणी करावी व त्यानंतर बैठक घ्यावी, असा कृती समितीचा आग्रह आहे. त्यासाठी कृती समितीच्यावतीने २४ जानेवारीला संबंधित अधिकाऱ्यांना पत्र पाठवून त्याची कल्पना दिली होती. पत्र पाठवून आठवडा उलटला तरी शासकीय अधिकाऱ्यांनी याचा कसलाच खुलास केलेला नाही, वा बैठकीचे स्थळ बदलण्याचे कळविलेले नाही.
या संदर्भात बोलतांना कृती समितीचे निमंत्रक श्रीनिवास साळोखे म्हणाले,की कोल्हापुरात होणाऱ्या बैठकीस ज्येष्ठ नेते एन.डी.पाटील, शाहू महाराज, खासदार सदाशिवराव मंडलिक, खासदार राजू शेट्टी यांच्यासह जिल्ह्य़ातील लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या सर्वाच्या सोबत होणाऱ्या बैठकीत या विषयाची सविस्तर चर्चा करता येणे शक्य आहे. त्यासाठी बैठक कोल्हापुरात व्हावी हा आमचा आग्रह आहे. मात्र, आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने उद्या होणाऱ्या बैठकीस सहभागी न होण्याचा निर्णय टोलविरोधी कृती समितीने घेतला आहे.एकाअर्थाने टोलविरोधी कृती समितीने या बैठकीवर बहिष्कार टाकला असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे उद्याची बैठक केवळ एक औपचारिकताच उरणार आहे.दरम्यान जिल्हाधिकारी राजाराम माने यांची आज टोलविरोधी कृती समितीने भेट घेतली.
खासदार मंडलिक, श्रीनिवास साळोखे, रामभाऊ चव्हाण, बाबा पार्टे, सुभाष वोरा, कॉ.दिलीप पवार, कॉ.चंद्रकांत यादव, अॅड.पंडीतराव सडोलीकर, अशोक भंडारे, मधुकर पाटील, बजरंग शेलार, भगवान काटे आदींचा यामध्ये समावेश होता. या कार्यकर्त्यांनी कोल्हापुरात आयआरबी कंपनीने बनविलेले रस्ते कसे निकृष्ट आहेत याचा अभ्यास करण्यासाठी प्रमोद बेरी यांनी बनविलेला अहवाल जिल्हाधिकारी माने यांना सादर केला.त्या संदर्भातील सविस्तर माहिती त्यांना देण्यात आली. माने यांनी आपणही या बैठकीला जाणार नाही, तर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारा चर्चेत सहभागी होणार असल्याचे सांगितले. महापालिका आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांच्या मार्गदर्शनाखाली रस्त्यांचे नमुने घेऊन त्यांचा अहवाल बनविण्यात आला आहे. तो बैठकीवेळी सादर केला जाणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी कृती समितीच्या कार्यकर्त्यांना सांगितले.