पाणी मागण्यास गेलेल्या बाभळगावच्या ग्रामस्थांवर स्थानिक आमदारांच्या मदतीने सरपंचाच्या तक्रारीवरून खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप करीत माकपने गुरुवारी पाथरी तहसील कार्यालयावर बैलगाडीसह मोर्चा काढला.
पाथरी तालुक्यातील बाभळगाव येथे तीव्र पाणीटंचाई आहे. माणसांसह जनावरांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत असताना ग्रामपंचायत कोणतीही उपाययोजना करीत नाही. उलट पंचायत समितीमार्फत येणाऱ्या पाण्याच्या टँकरचा लाभ केवळ सरपंचांनाच मिळत असल्याचा आरोप करून ग्रामस्थांनी शुक्रवारी बाभळगावच्या सरपंचाच्या घरी जाऊन पाण्याची मागणी केली. या वेळी सरपंच व ग्रामस्थांमध्ये हाणामारी झाली. यात परस्परविरोधी तक्रारी आल्याने २१जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकाराने गावातील शांतता भंग झाली असून दोन समाजांत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सरपंचाने केल्याचा आरोप माकपने केला. गावातील सामान्य लोकांवर अ‍ॅट्रासिटीचे गुन्हे स्थानिक आमदारांच्या मदतीने दाखल केले असल्याचा आरोप करतानाच हे गुन्हे त्वरित रद्द करावेत व गावात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, या मागणीसाठी माकपच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी पाथरी तहसीलवर बैलगाडीसह मोर्चा काढला. मोर्चात विलास बाबर, रामकिशन शेरे, लिंबाजी कचरे, दीपक लिपणे आदी सहभागी झाले होते.